नांदेड(प्रतिनिधी)-मोटार वाहन निरिक्षकाकडून उपोषण मागे घेण्यासाठी 25 हजार रुपये खंडणीची मागणी करून 20 हजार रुपये स्विकारणाऱ्या अखिल भारतीय मराठा महासंग्राम संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर यांना नांदेड ग्रामीण पोलीसांनी पकडले आहे. ही माहिती नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षकांची करीता स्वाक्षरी करून जारी करण्यात आली आहे.
प्रादेशीक परिवहन कार्यालय नांदेड येथील पंकज लक्ष्मणराव यादव या मोटार वाहन निरिक्षकांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 ऑगस्ट 2022 पासून विक्रम पाटील बामणीकर हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रादेशिक परिवहन कार्यालयाविरुध्द उपोषणास बसले होते. उपोषणादरम्यान विनाकारण आमच्या कार्यालयात येवून ते शासकीय कामात अडथळा निर्माण करत होते. उपोषण मागे घेण्यासाठी त्यांनी 6 सप्टेंबर रोजी परिवहन अधिकारी निमसे यांच्या कक्षात आम्हाला 25 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर ही रक्कम 20 हजार रुपये ठरली. याबाबत पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी खंडणीखोरावर कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड यांना दिले.
श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांनी पंकज यादव यांच्या अर्जावर कार्यवाही करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश थोरात, पोलीस उपनिरिक्षक आनंद बिच्चेवार, पोलीस अंमलदार प्रमोद कऱ्हाळे, संतोष जाधव, विश्र्वनाथ पवार, ज्ञानोबा कौठेकर, बालाजी लाढेकर, शिवानंद कालगुले, चंद्रकांत स्वामी यांची पथके तयार केली. पोलीसांनी दोन सरकारी पंच बोलावून उपोषणकर्ता विक्रम पाटील यास देण्यात येणारे 20 हजार रुपये रक्कमेचे नोट क्रमांक आपल्याकडे नोंदवून घेतले. सायंकाळी 7.10 वाजता हॉटेल पुजा गार्डन येथे विक्रम पाटील आणि पंकज यादव यांची भेट झाली आणि तेथे विक्रम पाटीने खंडणीचे 20 हजार रुपये स्विकारल्यानंतर त्यांना पकडण्यात आले. त्यांचे पूर्ण नाव विक्रम चंपती शिराळे (38) मराठवाडा अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंग्राम संघटना रा.बामणी ता.कंधार जि.नांदेड, ह.मु.चौफाळा नांदेड असे आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी जारी केलेल्या प्रेसनोटप्रमाणे विक्रम चंपती शिराळे विरुध्द गुन्हा क्रमांक 550/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 384 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश थोरात यांच्याकडे देण्यात आला आहे.
या खंडणीच्या कार्यवाहीसाठी पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांनी श्रीमान अशोकरावजी घोरबांड साहेबांसह नांदेड ग्रामीण पोलीसांचे कौतुक केले असल्याचे या प्रेसनोटमध्ये लिहिलेले आहे.
काल विक्रम संपती शिराळे यांना अटक झाल्यानंतर आज त्यांना नांदेउ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय-3 यांनी पोलीसांच्या विनंतीनुसार एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
