जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा आदेश ; तक्रारदारास 60 हजार रुपये द्यावे
नांदेड(प्रतिनिधी)-कोविड कालखंडामध्ये कोविड या आजाराचा गैरफायदा अनेकांनी घेतला पण त्यात डॉक्टर सारख्या व्यक्तीला सुध्दा त्याचा वाईट अनुभव आला अशी खंत व्यक्त करत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग नांदेडने आशा हॉस्पीटलचे डॉ.अंकुश देवसरकर आणि कोळकर मेडीकल ऍन्ड जनरल स्टोअर्सचे मालक अशा दोघांना 45 दिवसांच्या आत 60 हजार रुपये अर्जदार डॉ.कैलास भानुदास यादव यांना देण्याचे आदेश दिले आहेत.
वजिराबाद भागातील डॉ.कैलास भानुदास यादव यांनी 29 ऑक्टोबर 2020 रोजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार क्रमांक 929 /2020 दाखल केले. या तक्रारीतील माहितीनुसार डॉ.कैलास यादव यांचे वडील भानुदास परशुराम यादव यांना 16 जुलै 2020 रोजी थंडी ताप आला आणि त्यांच्या इलाजासाठी त्यांनी डॉ.अंकुश देवसरकर, आशा हॉस्पीटल भगवती कोविड केअर सेंटर यांच्याकडे नेले. त्या वेळेत कोरोना संग्रमण काळ होता. तेंव्हा डॉ.अंकुश देवसरकर यांनी भानुदास यादव यांच्या काही तपासण्या करण्यास सांगितले सोबतच कोविड तपासणी करण्यास सांगितले. 19 जुलै 2020 रोजी पुन्हा आपल्या वडीलांची तबेत बिघडल्यामुळे कैलास यादव यांनी आपल्या वडीलांना शासकीय रुग्णालय विष्णुपूरी येथे नेले. तेथे त्यांच्या वडीलांची कोविड तपासणी झाली आणि ती पॉझिटीव्ह आली.त्यानंतर 21 जुलै 2020 रोजी आमच्याकडे बेड उपलब्ध असल्याचे डॉ.अंकुश देवसरकर यांनी सांगितल्यानंतर कैलास यादव यांनी आपल्या वडीलांना 21 जुलै रोजी त्यांच्या दवाखान्यात दाखल केले. 28 जुलै पर्यंत त्यांचा उपचार सुरू होता. या दरम्यान त्यांना वडीलांची भेट घेवू देण्यात आली नाही. दुरध्वनीवरुन माहिती घ्यायची आणि उपचार सुरू असल्याबद्दल डॉक्टर सांगत होते. अशा प्रकारे भानुदास परशुराम यादव यांचा उपचार सुरू होता.
यावेळी तयार झालेल्या परिस्थितीतील दुर्देव असे की, भानुदास परशुराम यादव यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात दाखल करण्यात आलेले कागदपत्र, त्यास डॉक्टरांनी दिलेले उत्तर या सर्वांचा उहापोह करत ग्राहक तक्रार निवारण आयोगाने जवळपास 20 पानी निकालपत्र जाहीर केले. त्यात भरपूर नोंदी घेण्यात आल्या. यामध्ये एक डॉक्टर अशा त्रासाला बळी पडतो यापेक्षा दुर्देवाची गोष्ट काय? असा उल्लेख आपल्या निकालात आयोगाने केला. कोरोना काळात अनेकांनी याचा फायदा घेतला असेही एक वाक्य या निकालात लिहिलेले आहे.
या निकाल प्रकरणाचा निकाल देतांना आयोगाच्या अध्यक्षा अ.गो.सातपुते, सदस्य रविंद्र बिलोलीकर आणि सदस्या कविता देशमुख यांनी तक्रारदार डॉ.कैलाश यादव यांचा अर्ज अंशता: मंजुर केला आहे. हा अर्ज मंजुर करतांना काही जास्तीची बिले लावली गेली असा उल्लेख निकालात आहे. त्यासाठी आशा हॉस्पीटलचे डॉ.अंकुश देवसरकर आणि कोळकर मेडीकलचे मालक या दोघांनी मिळून डॉ.कैलास भानुदास यादव यांना 50 हजार रुपये, मानसिक व शारीरिक त्रासासाठी 5 हजार रुपये आणि तक्रारीचा खर्च 5 हजार रुपये 45 दिवसांत द्यावा असे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात डॉ.कैलास भानुदास यादव यांच्यावतीने ऍड.एस.डी.भोसले यांनी बाजू मांडली. डॉ.अंकुश देवसरकर आणि कोळकर मेडीकलच्यावतीने ऍड.पी.एस.भक्कड यांनी सादरीकरण केले होते.
कोरोना काळात जास्तीचे बिल लावणे आशा हॉस्पीटलला महागात पडले