नांदेड(प्रतिनिधी)-एकीकडे पाऊस त्रास देत आहे. तर दुसरीकडे 5 हजार 500 लोक वस्ती असलेल्या आणि शहराजवळ असलेल्या पावडेवाडी या ग्रामपंचायतीच्या हद्दीत जनता पाण्यासाठी त्रासली आहे. मागील दहा-बारा दिवसांपासून पाणी नसल्यामुळे लोकांचे हाल होत आहेत.
कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भौतिक सुविधा पुरविण्याची जबाबदारी त्यांच्यावरच असते. नांदेड जवळ पावडेवाडी ग्राम पंचायत आहे. या ग्रामपंचायतीमध्ये 5 हजार 500 एवढे मतदार आहेत. म्हणजे या भागाची लोकवस्ती जवळपास 25 हजार आहे. या ग्रामपंचायतीमध्ये 17 सदस्य आहेत. सध्या या ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश लोखंडे आहेत.
मागील दहा-ते बारा दिवसांपासून या भागाला पाण्याचा एक थेंब ग्राम पंचायतने पुरवलेला नाही. याबद्दल माहिती घेतली असता या भागातील नागरीक 800 रुपये खर्च करून पाण्याचे टॅंकर खरेदी करत आहेत. काही जण सांगतात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी असणाऱ्या तीन मोटारी खराब झाल्यामुळे ही समस्या तयार झाली आहे. या भागातील सदस्यांना नागरीकांनी विचारणा केली तर मी काय सरपंच आहे काय असे सदस्य सांगतात आणि सरपंचांना फोन केला तर ते फोनच उचलत नाहीत. अशा परिस्थिती ज्यांच्या घरात स्वत:चे बोअर आहेत त्यांनाच पाणी उपलब्ध आहे. इतर नागरीकांची मात्र अवस्था दैना झाली आहे.
मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाने सुध्दा मोठा जोर मारला आहे त्यामुळे पावडेवाडी भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. खड्डा कुठे आणि रस्ता कुठे हे समजतच नाही. अशा परिस्थितीत सुध्दा जनता लोकशाहीमध्ये आपले जीवन जगत आहे.
एकीकडे पावसाचे थैमान तर पावडेवाडी ग्रामपंचायतीने नागरीकांना एक थेंब पाणी पुरवठा केला नाही