नांदेड(प्रतिनिधी)-अनेक प्रकरणांमध्ये नामांकित पवन जगदीश बोरासह आता त्याचा मामा ही एका खंडणीप्रकरणात आरोपी झाला आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन देसरडा यांनी पवन बोराच्या मामाला दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
ओमप्रकाश गोपीलाल तापडीया रा.दिलीपसिंग कॉलनी वजिराबाद नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वजिराबाद भागातील खंडेलवाल कॉम्प्लेक्स येथे त्यांची पहिल्या मजल्यावर दुकान क्रमांक 4 ही दुकान 1998 मध्ये त्यांच्या पत्नीच्या नावे खरेदी केली आहे. दि.4 ऑगस्ट 2022 रोजी कोर्टाच्यावतीने नियमित दिवाणी दावा क्रमांक 375/2021 बाबतची नोटीस आली. ती वाचून पाहिली असता त्यामध्ये ती दुकान माझ्याच मालकीची आहे असा दावा पवन जगदीश बोरा उर्फ शर्मा यांनी केलेला होता. तो दिवाणी वाद परत घेण्यासाठी कुटूंबियांना जीवे मारण्याची धमकी देवून पवन बोराने आणि त्याचा मामा गोपाल तिवारीने 4 लाख रुपये खंडणीची मागणी केली. ओमप्रकाश तापडीया यांच्याकडून 50 हजार रुपयांची खंडणी घेतली आणि इतर खंडणीची मागणी करत आहे असा या तक्रारीचा आशय आहे.
या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीसांनी गुन्हा क्रमांक 327/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 386, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय मंठाळे यांच्याकडे देण्यात आला आहे. पोलीसांनी त्वरीत प्रभावाने गोपाल सिताराम तिवारीला अटक केली. आज दि.13 सप्टेंबर रोजी गोपाल तिवारीला न्यायालयात हजर केल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन देसरडा यांनी त्यास दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. पवन बोरा मात्र अद्याप वृत्तलिहिपर्यंत पोलीसांना सापडलेला नाही.
पवन बोरा आणि त्याचा मामाविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल