शिंदे-फडणवीस सरकार आपण तर आमच्या समस्या सोडवा हो…

लोहा(प्रतिनिधी)-शिंदे-फडणवीस सरकार तुम्ही तर आमचा प्रश्न सोडवा हो.. अशा विचाराचे आंदोलन करत गांधीनगर वस्ती धानोरा मक्ता ता.लोहा येथील नागरीकांनी आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन नदीत साजरा केला. गेल्या 35 वर्षापासून या भागात रस्त्याची मागणी होत आहे. करोडो रुपये खर्च करून द्रुतगती मार्ग बनवले जात आहेत. पण आम्हाला आजही नदीतून प्रवास करावा लागतो असे दु:ख गांधीनगर वस्तीतील ग्रामस्थांना आहे.
धानोरा मक्ता तालुका लोहा या गावापासून गांधीनगर असा प्रवास करतांना एक नदी आहे. गेली 35 वर्ष या नदीवरील रस्ता तयार करावा अशी 90 निवेदने महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाला दिलेली आहेत. सध्या भारतात अमृत महोत्सव साजरा होत आहे. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण झाली आहेत पण आम्हाला रस्त्यातून जाता येतांना आम्हाला मृत्यूची भिती आहे. कारण आम्हाला नदीतून धानोरा मक्ता ते गांधीनगर वस्ती असा प्रवास करावा लागतो. आमची लेकरे शाळेत जातात तेंव्हा कंबरे एवढ्या पाण्यातून कपडे भिजलेल्या अवस्थेत शाळेत जातात. वयस्क व्यक्ती , गरोदर स्त्रिया यांना दवाखान्यात देतांना मोठी समस्या होते अशा जीवघेण्या परिस्थितीतून आम्ही जगत असतांना आमची दखल कोणी घेत नाही. कोणी आमदार, खासदार यांनी कधीच गांधीनगर गावाला भेट दिली नाही. 35 वर्ष फक्त रस्त्यासाठी आम्ही संघर्ष करत आहोत. आजच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे ध्वजारोहण करतांना लवकरात लवकर मराठवाडा एवढा प्रगत होईल की, तो महाराष्ट्रात नंबर 1 वर असेल असे म्हणले होते. पण आमच्याकडे रस्त्याची दशा आणि आमच्या जीवनाची दुर्दशा पाहण्यास कोणीच तयार नाही. आज गांधीनगर ग्राम वासियांनी नदीपात्रात उभे राहुन आपले हे दु:ख व्यक्त करत मराठवाडा मुक्तीसंग्रामदिन साजरा केला. आता शिंदे-फडणवीस सरकारने तरी आम्हाला न्याय द्यावा अशी अपेक्षा गांधीनगरवासीयांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *