नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने दोन दुचाकी चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून 1 लाख 77 हजार रुपये किंमतीच्या पाच दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. या दोन्ही चोरट्यांना बिलोली पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या गुप्त माहितीनुसार बिलोली उपविभागात लोहगाव ता.बिलोली येथील प्रभाकर वानोळे यांच्या घरी जावून पोलीस पथकाने पाहणी केली असता त्यांच्या घराच्या पाठीमागे वेगवेगळ्या कंपनीच्या पाच दुचाकी गाड्या उभ्या होत्या. या गाड्या प्रभाकर मोहनराव वानोळे (23) रा.सिध्दार्थनगर लोहगाव ता.बिलोली आणि शिवशंकर भोजराम शेळके (24) रा.करखेली ता.धर्माबाद या दोघांनी चोरून आणलेल्या दुचाकी गाड्या आहेत आणि त्या विक्री करण्यासाठी ठेवल्या होत्या. या गाड्या चोरट्यांनी कासराळी, नरसी, वझरगा, करखेली शिवारातून चोरलेल्या आहेत. या सर्व गाड्यांची एकूण किंमत 1 लाख 77 हजार रुपये आहे. या चोरट्यांना पुढील तपासासाठी बिलोली पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, विजय कबाडे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोेलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंडे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक मारोती तेलंग, संजय केंद्रे, पोलीस अंमलदार सुरेश घुगे, विठ्ठल शेळके, मोतीराम पवार, महेश बडगु आणि हेमंत बिचकेवार यांचे कौतुक केले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेने चोरीच्या पाच दुचाकी पकडल्या