हैदराबाद मुक्ती संग्राम : विजयगाथा माहितीपटाची नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत झाली निर्मिती

नांदेड,(प्रतिनिधी)- हैदराबाद मुक्ती संग्राम अर्थात मराठवाडा मुक्ती संग्रामाचे हे अमृत महोत्सवी वर्षे सुरू झाले आहे. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 17 सप्टेंबर रोजी या संग्रामावर माहितीपट लोकांना उपलब्ध करून देता यावा अशी मनिषा विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी बाळगली होती. याची जबाबदारी नांदेड जिल्ह्यावर देण्यात आली. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने “हैदराबाद मुक्ती संग्राम : विजयगाथा” हा माहितीपट अत्यल्प काळात गुणवत्तेसह निर्मिती केला. 17 सप्टेंबर 2022 रोजी या माहितीपटाचे औरंगाबाद येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधीक विमोचन करण्यात आले.

माहितीपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे माहिती पोहचावी, या मुक्तीचे मोल व ज्यांनी लढ्यामध्ये योगदान दिले आहे त्यांची व विविध लढ्यांची माहिती या माहितीपटात घेतली आहे. यासाठी जिल्हाधिकारी खुशालसिंह परेदशी यांनी स्वतंत्र समिती तयार केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीत उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, संपादक शंतनू डोईफोडे, प्रा. डॉ. अशोक सिदेवाड, डॉ. महेश जोशी, डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. पी. विठ्ठल, डॉ. दीपक शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, अपर कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे, इनटॅच नांदेडचे सुरेश जोंधळे, तहसीलदार आर. के. कोलगने, नायब तहसिलदार स्नेहलता स्वामी यांचा समावेश होता.

समितीतील सर्व सदस्यांनी उपलब्ध असलेले मनुष्यबळ व कमी कालावधीत ऐतिहासिक संदर्भ असलेला माहितीपट निर्माण करण्याचे आवाहन पेलून दाखविले. यात मुक्ती संग्रामाचा संपूर्ण इतिहास जरी नसला तरी मुक्ती लढ्याची यात माहिती घेण्यात आली आहे. प्रा. डॉ. महेश जोशी यांनी अभ्यासपूर्ण संहिता यासाठी लिहून दिली. समितीतील सर्व सदस्यांची सहमती घेऊन हा माहितीपट अंतिम करण्यात आला. हा माहितीपट https://youtu.be/XYPXTZvWeek  या लिंकवर सर्वांसाठी मोफत उपलब्ध असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *