बिलोली न्यायालयाने कडक निर्बंध टाकून दिला जमीन;पाच लाख रुपयांचा जामीन
नांदेड,(प्रतिनिधी)- बहुचर्चित कुंटूर धान्य घोटाळ्यात उप जिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांना बिलोली जिल्हा न्यायाधीश डी.इ. कोठालीकर यांनी ५ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन देतांना अनेक कडक निर्बंध वेणीकर यांच्यावर टाकले आहेत.
सन २०१८ मध्ये कुंटूर येथे द इंडिया मेगा ऍग्रो अंदाज कंपनीत मोठा सरकारी धान्य घोटाळा उघडकीस आला. त्यात एकूण २३ आरोपीना अटक झाली आहे.गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला.सर्वात शेवटी उप जिल्हाधिकारी संतोष सीताराम वेणीकर यांना अटक करण्यात आली.अटकेपूर्वी वेणीकरांनी अनेक प्रयत्न केले.पण यश प्राप्त झाले नाही.अखेर त्यांनी नायगाव न्यायालयात समर्पण केले.पुढे पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी असा प्रवास करून पूर्ण झाला.
नायगाव न्यायालयाने नियमित जामीन नाकारल्यानंतर बिलोली जिल्हा न्यायालयात अपील करण्यात आले.या अपील प्रकरणात संतोष वेणीकर यांच्यावतीने ऍड.डी.के. हंडे आणि ऍड.श्रीकांत नेवरकर यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की वेणीकरची आपली जबाबदारी पूर्ण करण्यात चूक झाली असेल.त्यासाठी त्यांच्यावर विभागीय कार्यवाही सुरु आहे. या प्रकरणातील सर्व २३ आरोपीना अटक आणि जामीन प्राप्त झाला आहे.तेव्हा वेणीकरांना गजाआड ठेवून काय साध्य होणार आहे. सरकार पक्षाच्यावतीने जोरदार आक्षेप घेत जामीन देण्यात येऊ नये असा युक्तिवाद ऍड.संदीप कुंडलवाडीकर यांनी केला.
युक्तिवाद ऐकून न्या.कोठालीकर यांनी आपल्या निकालात अत्यंत कडक निर्बंध लावणे गरजेचे आहे अशी नोंद करत वेणीकरांनी ५ लाख रुपयांची जामीन द्यावी,आपले पासपोर्ट आणि तत्सम कागदपत्र न्यायालयात हजर करावे,कुंटूर पोलीस ठाण्यात प्रत्येक सोमवारी सकाळी ९ ते ११ यावेळेत हजेरी दयावी,आपल्या रक्ताच्या नात्यातील तीन लोकांचे निवासी पत्ते सादर करावेत आणि त्याची तपासणी कुंटूर पोलिसांनी करावी असे आदेशात लिहिले आहे.
या आदेशात संतोष वेणीकर हे ३ कोटी ८९ लाख ९३ हजार ७२८ रुपयांचा धान्य घोटाळा करणारे अजय बाहेती दमकोंडवार यांच्या संपर्कात होते याची ही नोंद घेतली आहे. पण अनेक दिवस तुरुंगवास भोगून संतोष वेणीकर यांना बिलोली न्यायालयाने दिलासा दिला आहे.