“शिवसेनेतील बंडखोरीचा मागोवा घेताना….!

 

मुंबई- राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था या संघटना म्हणून मजबूत होतील की मेंढराच्या कळपासारखे वागतील?”

प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे मी एक शेतकऱ्याचा पोरगा, रिक्षावाला, जातीने मराठा आहे म्हणून माझ्यावर टीका होते हा आरोप माननीय एकनाथजी शिंदे करतात तो किती योग्य? ते स्वतःला कोणत्या प्रकारचे शेतकरी समजतात?

शेतकरी तीन भूमिका बजावतो.मालक(leader) शेतात काय पिकवायचं याचा निर्णय स्वतः घेतो.दुसरा कारभारी किंवा व्यवस्थापक(manager).

मालकाचे निर्णय व्यवस्थित पूर्णपणे राबविणारा. तिसरी भूमिका शेतमजूर(worker) सांगकाम्या. सांगितलेले काम प्रश्न न विचारता डोके न चालवता राबविणे.

शपथ घेण्या अगोदर महाशक्तीने आखलेल्या कार्यक्रमानुसार आमदार फोडाफोडी व पळवा पळवी योजना व्यवस्थापकाच्या भूमिकेतून शिंदे साहेब यांनी राबवली हे दिसते. त्यांनी स्वतः नेता म्हणून निर्णय घेतल्याचे जाणवले नाही. शपथ घेतल्यावर धार्मिक भेटीगाठी, कार्यकर्त्यांच्या घरी जाणे, नाचणे हे सगळे कार्यकर्त्याप्रमाणे वर्तन दिसले. असे वर्तन कोठून आले?

ते मूळ राजकीय संघटनेच्या कार्यप्रणालीतून आलेले दिसते. कारण शिवसेनाच नव्हे तर इतर सर्व राजकीय पक्षांमध्ये कार्यकर्ता या भूमिकेतून घोंगडी उचलणे व व्यवस्थापक या भूमिकेतून कार्यक्रम पार पाडणे या दोनच कामासाठी संधी मिळते. मी अनेक राजकीय पक्ष,सामाजिक चळवळी संघटनेची माहिती घेतली तर बऱ्याच संघटनांना प्रशिक्षण घेणे, शिकणे, स्वाध्याय करणे याबाबतची शाखा प्रभावी असल्याचे दिसले नाही. आहेत त्या अगदी वरवरची मलमपट्टी करताना दिसतात .अशा संघटनांमध्ये कुपमंडूक प्रवृत्तीचे विहिरीतील बेडूक आणि टोपलीतील एकमेकांचे पाय खेचणारे खेकडे तयार होताना दिसतात. आणि मग महत्वकांक्षी कार्यकर्ते लोकशाही मार्गाने नव्हे तर टोळी संस्कृतीने सत्ता हस्तगत करण्याचे प्रयत्न करतात त्यालाच पाठीत खंजीर खुपसणे असे म्हणतात. Ed,सी बी आय, आयटी या बाबी आहेतच . अश्याच कार्यकर्त्यांना डाग देऊन व कल्हई करून पुन्हा त्याच पक्षाविरुद्ध अगर संघटने विरुद्ध ‘कंट्री चाणक्य’ कडून वापरले जाते हे आपण नुकतेच पाहिले.

संघटनेचे पदाधिकारी हे कार्यकर्त्यांचे दुसरे प्रमुख शत्रू ठरतात. आपल्यापेक्षा बलवान ‘श्वान’आपल्या हद्दीत निर्माण होऊ नये यासाठी ते खरी क्षमता असलेले नेते निर्माण होऊ देत नाहीत

राजकीय कार्यकर्त्यांचे हे वर्तन मला पोलीस दलात आढळले होते . पोलीस शिपाई म्हणून भरती झालेला पुढे अधिकारी झाला तरी काही अपवाद वगळता त्याचा दृष्टिकोन शिपाई दर्जाचा असायचा. आयपीएस म्हणून आलेला अधिकारी पोलीस महासंचालक झाला तरी अपवाद वगळता त्याच्यामध्ये युनिफॉर्म घातलेला सामान्य पदवीधर दिसायचा. पुढे संघटना वर्तनशास्त्र याचा अभ्यास केल्यावर लक्षात आले की शिपाई अगर ips म्हणून भरती होवून एक वर्षाचे ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर पुन्हा त्याच्या व्यक्तिगत(personal growth )आणि व्यावसायिक वाढीचे(professional growth)प्रयत्न संघटने कडून अगर व्यक्तिशः होत नाहीत. त्यावर उपाय म्हणून भारतीय एकत्र कुटुंब पद्धती , काय झेन, क्वालिटी सर्कल,आधुनिक व्यवस्थापन शास्त्र वगैरे चा वापर करून पोलीस दलामध्ये

‘काम सुधार मंडळ(work improment committee)’ही योजना राबवली होती. तिचे खूप फायदे जाणवले.

सर्वांगीण सामाजिक विकासासाठी राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, प्रसार माध्यमे या सर्व क्षेत्रात प्रभावी आणि परिणामकारक नेत्यांची(leaders)गरज आहे. म्हणून निवृत्तीनंतर नवी दिशा अकॅडमी मध्ये कुडाची शाळा आणि ‘बिन भिंतीची प्रयोगशाळा सहा वर्षापूर्वी’ निर्माण केलेली आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनासाठी गरजेनुसार(tailor made)काम सुधार मंडळ योजना तयार केलेली आहे.

युवक क्रांती दल संघटना, आम आदमी पक्ष

,इतर बहुतेक विचारधारांच्या राजकीय पक्षाच्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. चालू आहे. इतरांपेक्षा माझीच खोपडि सुपीक आहे हा दावा नाही.दुसर्‍या कडे बोट दाखवीताना चार बोटे आपल्याकडे वळतात हे वचन मला माहित आहे.  आधी केले मग सांगितले या उक्ती वर माझा विश्वास आहे.

 -सुरेश खोपडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *