नांदेड,(प्रतिनिधी)- शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने दोन दरोडेखोरांना पकडून जबरी चोरीचा गुन्हा २४ तासातच उघडकीस आणला आहे.
१९ सप्टेंबर २०२२ रोजी सोमेश नागेश शेट्टी यांनी तक्रार दिली होती की,त्यांचा मेव्हणा पावडेवाडी नाका रस्त्यावर १८ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पायी जात असतांना एका दुचाकी गाडीवर तीन दरोडेखोर बसून आले.सोमेश शेट्टीच्या मेव्हण्याच्या हातातील १५ हजार रुपये किमतीची स्मार्ट वॉच बळजबरी हिसकावून पळून गेले.या बाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४६/२०२२ भारतीय दंड संहितेच्या कलम ३९२,३४ नुसार दाखल झाला होता.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी डॉ.नितीन काशीकर यांनी आपल्या सहकारी अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना दिलेल्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाने आकाश गजानन गनगोपलवाड (२१) रा.पुष्पनगर नांदेड आणि सुधन गौतम कसबे (२०) रा.सावित्रीबाई फुले नगर नांदेड या दोघाना ताब्यात घेऊन चौकशी केली.तेव्हा त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले.या दोन दरोडेखोरांकडून शिवाजीनगर पोलिसांनी चोरलेली स्मार्ट वॉच आणि ती वॉच चोरण्यासाठी वापरलेली दुचाकी गाडी १ लाख रुपयांची असा एकूण १ लाख १५ हजारांचा ऐवज जप्त करून घडलेला जबरी चोरीचा गुन्हा फक्त २४ तासातच उघडकीस आणला आहे.
पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अधीक्षक निलेश मोरे,विजय कबाडे,पोलीस उप अधीक्षक चंद्रसेन देशमुख आदीनी शिवाजीनगरच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे,पोलीस उप निरीक्षक मिलिंद सोनकांबळे,पोलीस अंमलदार शेख इब्राहिम,दिलीप राठोड,रविशंकर बामणे,देवीसिंग सिंगल,शेख अझहर,दत्ता वडजे यांचे कौतुक केले आहे.