नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस पथकाने पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांच्या सक्षम नेतृत्वात दोन आरोपींना पकडून त्यांच्याकडून ऑगस्ट महिन्यात जप्त केलेला चोरीचा ऐवज फिर्यादीला परत केल्याबाबत प्रेसनोट जारी केली आहे.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी जनसंपर्क विभाग पोलीस अधिक्षक कार्यालय यांच्या मार्फतीने पाठवलेल्या माहितीनुसार जयभवानीनगर सिडको येथील विजय मारोती गुंडाळे यांच्या घरात 7 जुलै 2022 ते 13 जुलै 2022 दरम्यान झालेल्या चोरीत एक एलईडी टी.व्ही. 15 हजार रुपये किंमतीचा आणि रोख रक्कम 13 हजार रुपये असा 28 हजारांचा ऐवज चोरीला गेला होता. याबाबत 14 जुलै रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 414/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 457 आणि 380 नुसार गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक शेषराव शिंदे यांच्याकडे होता.
या प्रकरणात मनोज मारोती रायबोळे (35), लक्ष्मण माणिकराव जाधव (35), बालासाहेब लक्ष्मणराव मोरे (35) आणि गोविंद संभाजी पुयड (27) या चौघांना 19 ऑगस्ट 2022 रोजी अटक झाली होती. अति साहसी आरोपी असल्याने पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे प्रमुख आनंद बिचेवार, पोलीस अंमलदार प्रमोद कऱ्हाळे, संतोष जाधव, ज्ञानोबा कवठेकर, शिवानंद कानगुले, बालाजी लाडेकर यांच्या पथकाने वास्तववादी आणि तांत्रिक पुरावे उपलब्ध करून आरोपींचा शोध घेतला होता आणि त्यांच्याकडे विचारपुस करून 28 हजार रुपये किंमतीचा चोरी केला ऐवज जप्त केला होता.
दि.21 सप्टेंबर2022 रोजी न्यायालयाने हे चोरीचे साहित्य फिर्यादीला परत करण्याचे आदेश दिल्यानंतर हा सर्व मुद्देमाल फिर्यादीला परत करण्यात आला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सिध्देश्र्वर भोरे आदींनी नांदेड ग्रामीण पोलीसांचे विशेष अभिनंद केले आहे.
नांदेड ग्रामीण पोलीसांचे विशेष अभिनंदन; चोरीचा मुद्देमाल फिर्यादीला परत