नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेमधील कार्यकारी अभियंत्याच्या कक्षात जावून त्यांना धमक्या देत कोंडून टाकणाऱ्या आरोपीला वजिराबाद पोलीसांनी वेशांतर करून ताब्यात घेतले. आज या आरोपीला न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.23 मार्च 2022 रोजी सायंकाळी जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंता ओमप्रकाश निला हे आपल्या कार्यालयात बसलेले असतांना तेथे मारोती बिचेवार नावाचा माणुस आला आणि तो ओमप्रकाश निला यांना म्हणाला की तुम्ही उपअभियंता पदाचा कार्यभार शिवाजी वारकडला का देत नाही. तुम्ही फक्त मंत्र्यांचेच ऐकता काय असे बोलत निला यांच्या हातातील एक संचिका हिसकावून घेत ती भिरकावली. त्यानंतर नांदेड जिल्ह्यात तुम्हाला नोकरी करायची असेल तर मला 50 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. निला यांच्या कक्षातून बाहेर जातांना मारोती बीचेवरने त्यांच्या कक्षाची कडी लावून घेतली. सोबतच त्यांच्या कक्षावर कार्यरत सेवक मंमथ नरवाडेला मारहाण केली. या तक्रारीवरुन त्याच दिवशी गुन्हा क्रमांक 82/2022 दाखल झाला. या गुन्ह्यात भारतीय दंडसंहितेची कलमे 353, 332, 384, 342, 504, 506, 186 जोडण्यात आली.
गेली 5 महिने या गुन्हेगाराचा शोध होत होता. पण तो व्यक्ती मारोती व्यंकटी बिचेवार (48)रा.पिंपळगाव कौठा(चोर) ता.मुदखेड हा पोलीसांना छकवत होता. अखेर पोलीसांनी काल दि.26 सप्टेंबर रोजी वेशांतर करून त्याला ताब्यात घेतले.नंतर त्याला अटक झाली. आज दि.27 सप्टेंबर रोजी पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे पोलीस अंमलदार अंकुश पवार, प्रदिप येमेकर यांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने मारोती व्यंकटी बिचेवारला एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.