नांदेड(प्रतिनिधी)-एका राज्यातून दुसर्या राज्यात जनावरे चोरून नेणार्या एका टोळीला मदनुर पोलीसांनी गोळीबार केल्यानंतर मरखेल आणि देगलूर पोलीसांच्या मदतीने बळाचा वापर करून एकाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला ६२ वर्षीय व्यक्ती हरीयाणा राज्यातील आहे.
जनावरे चोरी करणारे आणि त्यांना पळून नेणे हा प्रकार आता नवीन राहिलेला नाही. या घटनांमध्ये महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये सुध्दा मोठी वाढ झालेली आहे. २६-२७ सप्टेंबरच्या मध्यरात्री सोनाळा रोड येथे एका गाडीवर संशय आल्याने पोलीस वाहन क्रमांक टी.एस.०९ पी.ए.३७१३ ने त्या गाडीचा पाठलाग केला. या गाडीत मदनूर येथील एस.आय. शिवकुमार आणि त्यांचे पोलीस अंमलदार होते. तेंव्हा संशयीत गाडीतील लोकांनी मदनूर पोलीसांवर दगडफेक केली. याचे प्रतिउत्तर देतांना मदनूर पोलीसांनी त्या जनावर चोरांवर बंदूकीतून फायरिंग केली. या फायरिंगमध्ये सहा गोळ्यांचा वापर झाला. चोरटे गोळीबाराच्या नंतर देगलूरमार्गे पुढे पळाले तेंव्हा मदनूर पोलीसांनी देगलूर पोलीसांना माहिती दिली. पुढे देगलूरचे पोलीस निरिक्षक सोहन माछरे, मरखेलचे सहाय्यक पोलीस निरिक्षक नामदेव मद्दे, पोलीस अंमलदार केंद्रे, पांढरे यांनी रस्त्यावर लाकडे लावून त्या गाडीला अडविण्याचा प्रयत्न केला. पण ती गाडी हणेगावकडे निघाली. पुढे पोलीस निरिक्षक गुट्टे, सोबत अनेक पोलीस अंमलदार हे हनेगाव पेट्रोलपंपाजवळ नाकाबंदीसाठी थांबले असतांना जवळपास रात्रीच्या ३ वाजेच्या दरम्यान ती संशयीत चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.२६ बी.एस.५३७४ ला त्या संशयीत वाहनाने धडक दिली. तेंव्हा गावकर्यांच्या मदतीने बळाचा वापर करून पकडण्यात आला. त्यात एक माणुस सापडला त्याचे नाव अर्षद सुब्बन खान रा.गवारका मेवात राज्य हरीयाणा हा सापडला. इतर चार जण पळून गेले. त्यांचे नावे रुस्तूम जावेद, अमजद, आबेज, आणि शब्बीर अशी आहेत. या संशयीत गाडीमध्ये एक गाय, तीन लोखंडी सळ्या, चार चाकू, पाच दगड आणि सहा विटांसह सात लाठ्या सापडल्यात. मरखेल पोलीसांनी तेलंगणा राज्यातील मदनूर पोलीस ठाण्याचे एसआय शिवकुमार यांच्याकडे पकडलेला इसम आणि गाडी स्वाधीन केली आहे.