नांदेड(प्रतिनिधी)-सध्या नवरात्र महोत्सव सुरू आहे. 6 ऑक्टोबर रोजी दुर्गामुर्तींचे विसर्जन होणार आहे. शहरातील नावघाट परिसर सुध्दा विसर्जन करण्यासाठीची एक महत्वाची जागा आहे. पण या मुर्ती विसर्जन परिसरातून होणाऱ्या अवैध वाळू उपसामुळे एका बालकाचा जिव धोक्यात आला होता. पण काही जणांनी त्याचे प्राण वाचवले. पण अवैध वाळू उपसावर कोण कार्यवाही करणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
काल दि.26 सप्टेंबर रोजी रहिमपुर भागातील अजय राजू दुर्वे हा बालक अंघोळ करण्यासाठी गोदावरी नदीपात्रात उतरला. वर पाणी आणि पाण्याखालची वाळू ही अवैध पध्दतीने उपसा केल्यामुळे या बालकाला त्या जागेचा अंदाज आला नाही आणि त्याचे पाय पाण्याखालील वाळूमध्ये रुतले. कारण काही ठिकाणी वाळू काढलेली आहे आणि काही ठिकाणी उंचवटे आहेत आणि हा भाग त्या बालकाला डोळ्यांची दिसला नाही. आणि त्याची अवस्था दुर्धर झाली. बालक पाण्यात बुडत आहे हे पाहुन नावघाट परिसरातील अग्नीवेश जोंधळे आणि ओम मेघावाले यांनी त्वरीत पाण्यात उतरून त्या बालकाला पाण्याबाहेर काढले आणि त्या बालकाचा जिव वाचला.
बालकाच्या जिवाला धोका उत्पन्न झाला हा प्रकार त्या भागातील नदीपात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उपसामुळेच घडला असे या भागातील नागरीक सांगतात. बालकाचा जिव तर वाचला मात्र होणाऱ्या अवैध वाळू उपसामुळे काही दिवसात येणाऱ्या दुर्गा महोत्सवाच्या विसर्जन प्रसंगी या नदीपात्रात असंख्य लोक उतरतील, आपल्या मुर्तीचे विसर्जन करतांना त्यांचे विसर्जन होणार नाही याची आज काहीही शाश्वती सांगता येणार नाही.
