नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टी खोट्या अफवा पसरवण्यामध्ये अत्यंत निष्णात आहे आणि त्यानुसार ते आपल्या सतेचा गैरवापर करत इतरांची बदनामी करतात असे वक्तव्य महाराष्ट्राचे कॉंगे्रस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले.
कॉंगे्रस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा प्रसारमाध्यमांसमोर सांगतांना बाळासाहेब थोरात बोलत होते. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, महाराष्ट्र प्रभारी संपतकुमार, श्रीमती मेता, शिवाजीराव मोघे, सोनम पटेल, आशिष दुवा, श्रीमती ठाकूर, आ.अमरनाथ राजूरकर, आ.मोहन हंबर्डे, डी.पी.सावंत, गोविंदराव पाटील नागेलीकर आदी नेत्यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
यासंदर्भाने पुढे बोलतांना बाळासाहेब थोरात म्हणाले की, कॉंगे्रसची विचारसरणी घटनेशी जोडलेली आहे. यासंदर्भाने महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला सरकारपासून दुर ठेवण्यासाठी एक सामंजस्य कार्यक्रम तयार करून आम्ही महाराष्ट्रात सरकार चालवले होते. खोटे बोलणे हे भाजपचे सुत्र आहे आणि कट्टरतेतुन देशाला विभाजीत करणे ही रणनिती आहे असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
भारत जोडो यात्रेबद्दल सांगतांना ही ऐतिहासीक पदयात्रा आहे. भारतातील विविधता आणि त्यातील एकता ही खऱ्या अर्थाने देशाची ताकत आहे. सध्याच्या परिस्थितीत बेरोजगारी वाढली आहे, कारखानदारी बंद पडली आहे, महागाईचा उद्रेक होत आहे आणि या परिस्थितीत देशाला एकत्रीत आणण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो ही पदयात्रा सुरू केली आहे. नांदेड जिल्ह्यापासून त्यांचे महाराष्ट्रात आगमन होईल आणि नांदेड जिल्ह्यातील नियोजन हे देशात सर्वोत्कृष्ट असेल असा विश्र्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

या यात्रेबद्दल बोलतांना अशोकराव चव्हाण म्हणाले की, ही यात्रा नागरी चळवळ आहे. आजपर्यंतच्या या यात्रेला भरपूर मोठा प्रतिसाद प्राप्त होत आहे. देशातील 12 राज्य आणि दोन केंद्र शासित प्रदेश असा एकूण 3 हजार 570 किलो मिटरचा प्रवास ही यात्रा कन्याकुमारी ते कश्मिर असा करणार आहे. नांदेड जिल्ह्यात या यात्रेचा टप्पा 360 किलो मिटरचा आहे. त्यात 18 रात्र नांदेड जिल्ह्यात आहेत. त्यात सहा मुक्काम नांदेड जिल्ह्यात आहेत. देगलूरपासून नांदेड जिल्ह्यात प्रवेश करणारी ही यात्रा नायगाव, नांदेड, अर्धापूर असा प्रवास करून हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. एकंदरीत ही यात्रा देशात नवीन चळवळ सुरू करणारी ठरेल असा विश्र्वास अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला.