सावित्रीबाईंनी, देवी सरस्वतीचा आपल्या पुस्तकात उल्लेख करून स्तुती केलेली आहे असे दिसते ते मान्य. पण नंतरच्या काळात सनातनी धर्मातील अनेक बाबी त्यांनी नाकारलेल्या आहेत.
सावित्रीबाईंचा फोटो उपलब्ध आहे. त्यांचे अस्तित्व ,कार्य याचा पुरावा उपलब्ध आहे . तसे देवी सरस्वती बद्दल माहिती काय आहे?
माझ्या वाचनात आले की सरस्वतीचा जन्म डायरेक्टली ब्रह्माच्या वीर्यातून झाला. कोणतीही स्री नसताना. ही बाब अनैसर्गिक व अशास्त्रीय वाटते. पुढे असेही वाचनात आले की ब्रह्माने या सरस्वतीशी लग्न करून तिच्या सहाय्याने संपूर्ण सृष्टी निर्माण केली. म्हणजे आपल्या मुलीच्या समागमातून सृष्टी निर्माण केली. हे देखील अनैतिक व अशास्त्रीय वाटते .शाळेत सरस्वती च्या फोटोची पूजा करायचो तो फोटो रविवर्माने अंदाजे दोनशे वर्षांपूर्वी एका भावीनीला समोर बसवून काढलेला आहे. सृष्टी निर्माण करताना सरस्वती ची वेशभूषा अशी नसावी. सनातन धर्मानुसार स्री ही शूद्र आहे तिला शिकण्याचा अधिकारच नाही मग तिला इतरांना शिकवण्याचा अधिकार कसा व कुठून मिळाला हे समजत नाही.आमची पवित्र देवता म्हणून सरस्वती बद्दल पूर्ण आदर आहे तरीपण अशा अशास्त्रीय, अनैसर्गिक, अनैतिक स्वरूपात मांडलेल्या सरस्वती बद्दल मत साशंक बनले. मग कंट्री चाणक्य म्हणून ओळखले जाणाऱ्या देवेंद्रजींना हा प्रश्न का पडत नाही? माझ्या नातीच्या शाळेत सृष्टीच्या निर्मिती बद्दल ‘बिग बँग’ थेरी शिकवली जाते (जी आम्ही ‘कुडाच्या शाळेत’ सविस्तर दाखविली आहे). देवेंद्रजी ची मुलगी त्याच वयाची आहे. तिला वेदात सांगितलेली सृष्टी निर्मितीची थियरी शिकवली जाते का? डार्विन थेरीनुसार माणूस (होमो सेपियन) माकडापासून उत्क्रांत झाला असे माझ्या नातीला शिकवले जाते तर आपल्या वडिलांचे पूर्वज आदी पुरुषाच्या मुखातून जन्मले असे देवेंद्र यांच्या मुलीला शिकवले जाते का? मुळीच नाही ! तरीपण देवेंद्रजींचा सावित्रीचा फोटो कायम ठेवण्याचा आग्रह का असावा?
त्याचे महत्त्वाचे कारण सनातन धर्मात वाखाणलेली सरस्वती नाकारली तर अनेक प्रतीक नाकारली जातील. ब्राह्मण हा ब्रह्माच्या तोंडातून आल्याने सर्वश्रेष्ठ आहे तसेच ब्राह्मण वर्ण जात ही मास्टर रेस आहे हे देखील नाकारले जाऊ शकते ही भीती त्यांना वाटते. देवेंद्र फडणवीस व मंडळींचे राजकारण हे बहुजनांच्या कल्याणासाठी नाही. तर त्यांना सनातनी धर्मामध्ये ब्राह्मण श्रेष्ठत्व व मास्टर रेस हे सिद्ध करायचे व कायम राखायचे आहे म्हणून ते अतर्क्य , अनैसर्गिक, अशास्त्रीय अवैज्ञानिक बाबी उचलून धरणारच!
(माणसांचा एक गट श्रेष्ठ व दुसरा कनिष्ट असलेला समाज व देश प्रगत होवू शकत नाही म्हणुन लिहावेसे वाटले. )
सुरेश खोपडे