
नांदेड,(प्रतिनिधी)- पुणे ग्रामीण भागातील शिक्रापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी करणारा दरोडेखोर नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने पकडून शिक्रापूर पोलिसांच्या हवाली केला आहे.
पुणे ग्रामीण भागातील शिक्रापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरी प्रकरण गुन्हा क्रमांक ८१०/२०२२ मधील एक गुन्हेगार निहाल विनायक पाईकराव (२५) हा नांदेडच्या शिवाजी नगर पोलीस स्टेशन हदीत राहतो अशी माहिती शिक्रापुर पोलिसांना मिळाली.तेव्हा शिक्रापूर पोलीस नांदेडला आले.त्यांनी शिवाजीनगर पोलिसांशी संपर्क साधला.शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक डॉ.नितीन काशीकर यांनी आपल्या पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला याची जबाबदारी दिली. गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे,पोलीस उप निरीक्षक मिलिंद सोनकांबळे,पोलीस अंमलदार शेख इब्राहिम,दिलीप राठोड,रविशंकर बामणे,देवीसिंह सिंगल,शेख अझहर,दत्ता वडजे यांनी त्वरित प्रभावाने दरोडेखोर निहाल विनायक पाईकराव यास पकडून पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,विजय कबाडे,पोलीस उप अधीक्षक चंद्रसेन देशमुख यांनी शिवाजीनगर पोलिसांचे कौतुक केले आहे.