
नांदेड(प्रतिनिधी)- नवरात्र सणाच्या अंतिम दिवशी आज दसरा, हल्ला महल्ला, धम्मचक्र प्रवर्तन दिन असे विविध उत्सव उत्साहात साजरे झाले.
पहाटे 3 वाजल्यापासून शहरातील विविध बालाजी मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. एक-दुसऱ्याला सोने देऊन दसऱ्याच्या शुभकामना देण्यात आल्या. पहाट झाल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथकाने संचलन केले. सर्वत्र उत्साह होता.
दुपारनंतर सचखंड श्री हजुर साहिब येथून हल्ला महल्ला ही मिरवणुक निघाली. देश-विदेशातून या दर्शनासाठी अनेक भाविक सहभागी झाले होते. शस्त्र प्रदर्शन (गदगा), अश्व यांच्यासह निघालेली ही मिरवणुक पाहण्यासाठी गर्दी जमली होती. सायंकाळी 6 वाजता महावीर चौक येथे प्रतिकात्मक हल्ला झाला. पुढे मिरवणुक बाफना टी पॉंईट मार्गे सचखंड श्री हजुर साहिब येथे पोहचली.
गाडीपूरा येथील भगवान बालाजींची मिरवणुक सायंकाळी निघाली. मिरवणुकीनंतर गांधी राष्ट्रीय हिंदी विद्यालयाच्या समोर रावण दहन करण्यात आले. एकता मित्रमंडळाने नवा मोंढा येथे रावण दहनाचा कार्यक्रम केला. सिडको येथे सुद्धा रावण दहन करण्यात आले.
सायंकाळी हातात मेणबत्त्या घेऊन धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मिरवणुका शहरातील विविध भागातून निघाल्या आणि त्यांच्या सांगता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर झाली.

आज सर्वत्र विविध सण-उत्सव असल्यामुळे पोलिसांनी सकाळपासूनच वेगवेगळ्या ठिकाणी फिक्स पॉंईटनुसार काम केले. पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या नेतृत्वात असंख्य पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, होमगार्ड यांनी आजचे सर्व सण-उत्सव आनंदात व र्निविघ्न पार पाडण्यासाठी मेहनत घेतली.