नांदेड,(प्रतिनिधी) – नांदेड नव्हे संपूर्ण भारतात नाव लौकीक झालेले बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारस प्रमाणपत्र घेण्याची कार्यवाही न्यायालयात प्रलंबित असताना तसेच त्या प्रकरणात आम्हाला हे प्रकरण न्यायालयात चालवायचेच नाही असा अर्ज देणाऱ्या संजय बियाणी यांच्या पत्नी अनिता बियाणी या व्यवसायाशी संबंधित अनेकांना त्रास देत असल्याची घटना काल दिनांक 9 ऑक्टोबर रोजी कौठा भागात घडली. याबाबत 34 जणांची स्वाक्षरी असलेला एक अर्ज अनिता बियाणी यांच्याविरुद्ध त्या लोकांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिला आहे. याबाबत कार्यवाही काय झाली हे समजले नाही. परंतु त्या बियाणी पार्क मध्ये राहणाऱ्या लोकांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
एप्रिल महिन्यात नांदेड मध्ये बांधकाम व्यवसायिक म्हणून अत्यंत प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व संजय बालाप्रसाद बियाणी यांची मारेकऱ्यांनी हत्या केली. त्यानंतर आज पर्यंत संजय बियाणीच्या हत्याकांडात अटक करण्यात आलेल्या 13 आणि फरार असलेल्या तीन अशा 16 जणांविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे.
कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यानंतर उपलब्ध संपत्तीवर आपला दावा दाखल करण्यासाठी न्यायालयातून वारसा प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यानुसार अनिता संजय बियाणी आणि त्यांच्या दोन मुली व एक मुलगा या सर्वांच्यावतीने नांदेड न्यायालयात वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला.या प्रकरणात आणखी एका महिलेने मला एक मुलगी आहे असे सांगत मी आणि ती मुलगी संजय बियाणी यांची वारसदार आहेत. असा प्रतिवाद उपस्थित केला यानंतर अनिता संजय बियाणी व इतरांनी आपला मूळ वारसा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रकरणात तो अर्ज आम्ही परत घेत आहोत अशी विनंती न्यायालयासमक्ष केली. खात्रीलायक सूत्रांकडून घेतलेल्या माहितीनुसार आज पर्यंत त्या अर्जावर काहीही निकाल न्यायालयाने दिलेला नाही.
संजय बियाणी यांनी आपल्या हयातीत कौठा भागात बियाणी पार्क नावाची एक वसाहत विकसित केली. या वसाहतीत माहेश्वरी समाजाच्या काही लोकांना ना नफा ना तोटा या तत्त्वावर 52 लोकांना सदनिका आणि 21 लोकांना रो हाऊस देण्यात आले. या विकसित वसाहतीचे उद्घाटन झाले तेव्हा देशभरातील माहेश्वरी समाजातील प्रमुखांना बोलावण्यात आले होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या वसाहतीचे उद्घाटन झाले होते.
संजय बियाणी यांच्या मृत्यूनंतर अनिता संजय बियाणी यांनी संपत्तीचे वारसा प्रमाणपत्र नसताना ताबा घेतला. बियाणी पार्क मध्ये राहणाऱ्या मंडळीकडून वीज जोडणी घेण्यासाठी 35 हजार रुपये प्रत्येक व्यक्तीकडून घेऊन अनिता यांनी तो वीजपुरवठा करून दिला नाही. तेव्हा या वसाहतीतील लोकांनी स्वत 5 हजार रुपये खर्च करून वीज जोडणी करुन घेतली आहे. या 73 लोकांपैकी काही जणांच्या रजिस्ट्री झालेल्या नाहीत त्यांना तर अनिता बियाणी या भरपूर त्रास देत आहेत, असा त्यांचा आरोप आहे. दिनांक 9 ऑक्टोबर रोजी अनिता बियाणी पार्क मध्ये गेल्या तुम्हाला फुकटात मिळालेली घरे आहेत, पैसे कधी दिले, कोणाला दिले, असे जोरजोरात ओरडत त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या व्यक्तींच्या हातावर मारून तो व्हिडिओ होणार नाही याची दक्षता घेतली. तरीही व्हिडिओ तयार झालाच. सुरुवातीला अत्यंत नम्रपणे बोलणाऱ्या अनिता बियाणी यांचा एके ठिकाणी आपला शब्दांवरून ताबा गेला आणि त्यानंतर घडलेल्या वादातून हा प्रकार घडला.
संजय बियाणी पार्क मधील जवळपास 34 लोकांची स्वाक्षरी असलेला एक अर्ज काल 9 ऑक्टोबर रोजी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे देण्यात आला. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात यातील बहुतेक मंडळी गेली होती परंतु त्या अर्जावर काही कार्यवाही झाली नसल्याचे सांगण्यात आले. अनिता संजय बियाणी बोलत आहेत त्यामध्ये त्यांचा व्हिडिओ करणारा व्यक्ती सांगत आहे की पोलिसांना सोबत घेऊन मला मारहाण करतेस काय ? यावरून काय विचार व्हायला हवा हा आता पोलीस विभागाचा प्रश्न आहे.नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अत्यंत कर्तव्यदक्ष, कर्तबगार आणि गुन्हेगारीचे कर्दनकाळ पोलीस निरीक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेब आहेत. त्यामुळे गरिबांना न्याय मिळेल अशी अपेक्षा बियाणी पार्क मधील लोकांना आहे.आजच्या परिस्थितीत पार्कमध्ये जवळपास 40 – 42 कुटुंब राहतात याचा अर्थ हा सामाजिक प्रश्न आहे एक व्यक्ती आणि समाज यामध्ये समाज नेहमीच मोठा असतो. समाजाने सांगितले आहे की अत्यंत घाणेरड्या पद्धतीचे बांधकाम करून त्याचा ताबा दिला जात आहे. त्यावरही आमचा आक्षेप आहे. तरीपण आम्हाला राहण्यासाठी निवारा देणाऱ्या संजय बियाणी यांचे आम्ही आभारी आहोत पण त्यांच्यानंतर पूर्णपणे अधिकार नसताना सुद्धा आमच्यावर दादागिरी करणाऱ्या अनिता संजय बियाणी विरुद्ध आम्ही आंदोलन करणार आहोत, असे संजय बियाणी पार्क मधील रहिवाशांचे सांगणे आहे.