1975 पासून मी काँग्रेस, पूलोद, युती, आघाडी, महाआघाडी मॉडेल ही सरकारे आतून यथाशक्ती पाहिली व अनुभवली. एक जाऊन दुसरे आल्यानंतर सामान्य माणसाच्या जगण्यात फारसा फरक पडलेला दिसला नाही. कारण आम्ही फक्त चेहरे बदलतो. व्यवस्था तीच राहते. व्यवस्था समजणे आणि ती बदलणे ही तशी सोपी गोष्ट नाही ती एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया प्रभावी व गतिमान करण्याची संधी मला शिवसेनेच्या फुटीच्या घटनेमध्ये व उद्धव ठाकरे यांच्या वर्तनामध्ये निर्माण झालेली दिसते.
माझ्या अल्पमतीनुसार सनातनी ब्राह्मणी विचारसरणीने इथली प्रत्येक संस्था दूषित केलेली आहे. या मातीत मूळ असलेले जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन, साहित्यामधील नोबेल पारितोषिक मिळविलेले नाय पॉल या आधुनिक विचारवंतांनी हेच मत मांडलेले आहे. इथल्या संत व महामानवाणी यापूर्वीच ते सांगितलेले आहे .जवळकर व इतर ब्राह्मणेतर चळवळीमधील नेत्यांनी हीच सल मांडली होती. पुढे ती चळवळ थंडावली. आज तर मोहन भागवतांनी जाहीरपणे मान्य केलं की या ब्राह्मणांनी केवढे मोठं पाप केलेला आहे ते !
माझ्या निरीक्षणा नुसार शेंडी जानव्याना जाहीरपणे आव्हान देणारे, त्यासाठी राजकीय करिअर पणाला लावणारे उद्धवजी ठाकरे हे पहिले दृष्टे राजकीय नेते आहेत.
प्रत्येक गोष्ट दोनदा तयार होते.पहिल्यांदा विचारातून. दुसऱ्यांदा प्रत्यक्ष कृतीतून.
भारतीयांचे खरे कल्याण होणारा विचार उद्धव ठाकरे यांनी मांडलेला आहे. मी शिवसैनिक नव्हतो. नाही. तरीपण हे ध्येय गाठण्याची साठी कृती करण्याचे “अठरा पगड मावळे शिवशाही “हे मॉडेल आम्ही त्यांना सादर करीत आहोत. त्यांना ते पटले व देश जोडण्या साठी ते राबविण्याचे ठरविले तर तो झेंडा अभिमानाने हाती घेण्याचा निर्धार केला आहे!
-सुरेश खोपडे