नांदेड(प्रतिनिधी)-शेतातून मातीचे टिप्पर भरून जातांना प्रत्येक टिप्परमागे 50 रुपयांची मागणी करून चार जणांनी एका व्यक्तीवर केलेल्या हल्ला प्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी चौघांना पाच वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी 5 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
दि.5 फेबु्रवारी 2014 रोजी सायंकाळी 5 वाजता गणपती लिंबाजी पवार (45) रा. खुजडा ता.मुदखेड हे विट बनविण्याची माती टिप्प्रमध्ये भरून घेवून जात असतांना खुजडा ते इळेगाव रस्त्यावर जकोजी दिगंबर कुऱ्हे(37), अंबादास दिगंबर कुऱ्हे (65), दत्ता देविदास कुऱ्हे(25) आणि प्रभाकर अंबादास कुऱ्हे (19) सर्व रा. खुजडा ता.मुदखेड यांनी गणपती लिंबाजी पवार यांना अडवून टिप्पर नायचे असतील तर प्रत्येक टिप्परला 50 रुपये द्यावे लागतील, आमच्याविरुध्द पोलीसात तक्रार करतोस काय असे म्हणत जकोजी आणि अंबादास कुऱ्हे यांनी लोखंडी रॉड आणि कुऱ्हाडीच्या साहय्याने गणपती पवारच्या डोक्यावर आणि दोन्ही पायांवर जखमा केल्या. तसेच दत्ता आणि प्रभाकर कुऱ्हे यांनी लाकडाने गणपती पवारला मारहाण केली. या तक्रारीनुसार मुदखेड पोलीसांनी गुन्हा क्रमांक 11/2014 भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 385, 506, 34 आणि भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 नुसार दाखल केला. सहाय्यक पोलीस निरिक्षक विशान नंदे यांनी या प्रकरणाचा तपास करून त्या मारहाण करणाऱ्यांविरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले.
न्यायालयात हे प्रकरण सत्र खटला क्रमांक 137/2014 नुसार चालले. या प्रकरणात 17 साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदवले. उपलब्ध पुराव्याच्या आधारावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी कुऱ्हे कुटूंबातील चार जणांना भारतीय दंड संहितेच्या कलम 307 आणि 385 नुसार पाच वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येक 10 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली.या खटल्यात सरकार पक्षाची बाजू जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी मांडली.या खटल्यात पैरवी अधिकाऱ्याची भुमिका मुदखेडचे पोलीस अंमलदार अजय साखळे यांनी पुर्ण केली.