
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीसांना दिवाळी बोनस, पाच दिवसांचा आठवडा व सार्वजनिक सुट्ट्यांचा मोबदला म्हणून दरवर्षी एक अतिरिक्त पगार मिळावा यासाठी समर्पण प्रतिष्ठाणच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले.
माजी पोलीस अंमलदार मधूकर रघुनाथ केंद्रे यांनी समर्पण प्रतिष्ठाण नांदेडची स्थापना केली आहे. या संस्थेत सर्व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार सदस्य आहेत. सध्या विविध स्तरावरून पोलीस विभागाला दिवाळी बोनस मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नात समर्पण प्रतिष्ठाणच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे पोलीसांना सुध्दा आठ तासांच्या सेवेचा पगार मिळतो परंतू पोलीस हा दररोज 10 ते 12 तास काम करतो. प्रसंगी त्याला 24 तास काम करावे लागते. पोलीसांना पाच दिवसांचा आठवडा लागू नाही. पोलीसांना दिवाळी बोनस मिळत नाही. एखादी सार्वजनिक सुट्टी आली त्यावेळी इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी त्या सार्वजनिक सुट्टीला जोडून किरकोळ रजा घेतात आणि पर्यटनाचा आनंद घेतात. पण पोलीसांना तो मिळत नाही. कोरोना लढाईमध्ये 265 पोलीसांनी आपला जीव गमावला आहे. या सर्व प्रकरणांना लक्षात घेता पोलीस विभागासाठी सेवानिवृत्त पोलीसांना दिवाळी अग्रीम मिळावे, सातवा वेतन आयोगाचा चौथा हप्ता मिळावा, पाच दिवसांचा आठवडा व सार्वजनिक सुट्ट्यांच्या मोबदल्यात पोलीस विभागाला एक अतिरिक्त पगार मिळावा आणि दिवाळी बोनस मिळावे अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात समर्पण संघटनेचे अध्यक्ष एम.आर.केंद्रे, संभाजी होनराव यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे. याप्रसंगी बरेच सेवानिवृत्त पोलीस हजर होते.