नांदेड(प्रतिनिधी)-आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परिक्षा योजना (एनएमएमएस)निश्चित झाली आहे. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिध्द पत्रकाद्वारे ही माहिती प्रसारीत केली आहे. इयत्ता 8 वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही परिक्षा दि.28 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात येणार आहे.
इयत्ता 8 वी वर्गात शिकणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी ही शिष्यवृत्ती परिक्षा निश्चित करण्यात आली आहे. ज्या पालकांचे उत्पन्न 3 लाख 50 हजार पेक्षा कमी आहे. त्या विद्यार्थ्यांना परिक्षेतील गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्ती वाटप करण्यात येईल. दि.10 ऑक्टोबरपासून या परिक्षेची आवेदने स्विकारण्यास सुरूवात झाली आहे. परिषदेच्या https://www.mscepune.in आणि https://nmmsmsce.in या संकेतस्थळांवर हे अर्ज भरता येतील. महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासन मान्य, अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता 8 वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी आणि विद्यार्थीनी या परिक्षेस पात्र आहेत. या पाल्यांच्या पालकांचे अर्थात आई-वडीलांचे दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न 3 लाख 50 हजार पेक्षा कमी असावे.नोकरीत असलेल्या पालकांनी आस्थापना प्रमुख व इतरांनी तहसीलदार यांचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र शाळेतील मुख्याध्यापकांकडे जमा करावे लागतील. तो उत्पन्न दाखला संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापकांनी जतन करून ठेवायचा आहे.
7 वीमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थींनी 55 टक्के गुण प्राप्त केलेले असावेत. त्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना किमान 50 टक्के गुण प्राप्त असावेत. या परिक्षेमध्ये विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी, केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, शासकीय वस्तीगृहाच्या सवलतीचा, भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी, सैनिक शाळांमध्ये शिकवणारे विद्यार्थी या परिक्षेस पात्र आहेत.
विद्यार्थ्यांची निवड लेखी परिक्षेमधून करण्यात येईल.राज्याने निश्चित केेलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. दि.18 डिसेंबर रोजी होणाऱ्या या परिक्षेसाठी बौध्दीक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणी असे 2 प्रश्न पत्र असतील. यात दृष्टी अपंग विद्यार्थ्यांना 30 मिनिटांचा वेळ जादा मिळणार आहे. या परिक्षेमध्ये शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी किमान 40 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण टक्केवारी 32 आहे. या परिक्षेमध्ये सामान्य विज्ञान, समाजशास्त्र, गणित, भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र, जिवशास्त्र, ईतिहास, नागरीकशास्त्र, भुगोल आदी विषयांचा समावेश आहे. ही परिक्षा पर्याय पध्दतीची आहे.
आवेदन पत्र ऑनलाईन भरतांना 10 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान 120 रुपये फिस भरावी लागेल. उशीर झाला तर 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान 240 रुपये फिस लागेल. अति विलंब आवेदन पत्रांसाठी 6 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान 360 रुपये फिस लागेल. या परिक्षेत शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना दरमहा 1 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळेल. शिष्यृवत्ती कायम राहण्यासाठी इयता 9 ते 12 वी दरम्यान विद्यार्थी पहिल्या परिक्षासंधीत उतीर्ण व्हायला हवा. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी दहावीमध्ये 55 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. तसेच इतर विद्यार्थ्यांनी 60 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी 18 डिसेंबर रोजी शिष्यृवत्ती परिक्षा