नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन युवतीची तिच्या घरात घुसून छेड काढतांना आई-वडीलांना मारुन जखमी करणाऱ्या युवकाला विमानतळ पोलीसांनी 24 तासांत जेरबंद केले आहे.
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन बालिकेने दिलेल्या तक्रारीनुसार गोविंदनगर भागात राहणारा रोहित उर्फ सोन्या शंकर वाघमारे (19) हा तिला नेहमी त्रास देत असे. त्या युवतीच्या आई-वडीलांनी अनेकदा आपले घरे बदलली तरी पण रोहित उर्फ सोन्या हा युवक त्या युवतीला त्रास देण्यापासून थांबत नाही. अखेर 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता ती युवती आपल्या घरात स्वयंपाक करत असतांना सोन्या उर्फ रोहित वाघमारे तिच्या घरात घुसला त्यावेळी त्याच्या हातात तलवार होती. त्याने त्या युवतीच्या आईसमोर तिचा हात धरून ओढला. घडलेला प्रकार युवतीच्या वडीलांना माहित झाल्यानंतर ते आपल्या दुकानातुन पळत आपल्या घरी आले.तेंव्हा त्या युवकाने युवतीच्या आईच्या पोटावर लावलेले तलवारीचे टोक काढून तिच्या वडीलांवर हल्ला केला. त्यांना खाली पाडले आणि पाठीवर तलवारीने मारले त्यात त्यांना जखम झाली. रोहित उर्फ सोन्याने पळून जातांना पुन्हा त्या युवतीला धमकी दिली की, तु फक्त माझीच आहेस, मी तुझ्यावर प्रेम करतो तु प्रतिसाद दिला नाहीस तर तुला खतम करतो. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 353/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 394(ड), 452, 323, 504, 506 भारतीय दंड संहिता आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 नुसार दाखल झाला.
विमानतळचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्या मार्गदर्शनात आज दि.17 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या तपासणी पथकाने रोहित उर्फ सोन्या शंकर वाघमारे (19) यास अटक केली.
तलवारीच्या धाकावर तु फक्त माझी आहेस अशी अल्पवयीन युवतीला धमकी देणारा युवक जेरबंद