नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन जबरी चोरीच्या गुन्ह्यातील पाच गुन्हेगारांना जेरबंद करून त्यांच्याकडून 1 लाख 90 हजार 100 रुपयांचा ऐवज जप्त करण्याची कामगिरी स्थानिक गुन्हा शाखा पथकाने केली आहे.
जुना कौठा भागातून रस्त्यावरून जाणाऱ्या एका माणसाला हत्यारांचा धाक दाखवून त्याच्याकडून सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 627/2022 दाखल करण्यात आला होता. तसेच लातूर फाटा जवळ एका व्यक्तीला खंजीरचा धाक दाखवून जबरी चोरी झाली होती. त्या प्रकरणाचा एक गुन्हा क्रमांक 635/2022 दाखल होता.
या गुन्ह्याच्या संदर्भाने 21 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हा शाखेने आतिश जिवनसिंह ठाकूर (22) रा.असदवन यास ताब्यात घेवून विचारणा केली असता त्याने शाम उर्फ शाम्या मुंजाजी सोनटक्के (22) रा.हनुमान मंदिरजवळ जुना कौठा नांदेड, राहुल उर्फ सोन्या रमेश राऊत (25) रा.छत्रपती चौक नांदेड, करण अशोक भोकरे (23) रा.जुना कौठा, सुनिल उर्फ सोन्या अशोक गायकवाड (20) रा.जुना कौठा यांनी मिळून हे दोन जबरी चोरीचे गुन्हे केल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर सर्व आरोपींना पकडून स्थानिक गुन्हा शाखा पोलीसांनी त्यांच्याकडून चोरीतील अंगठी, रोख रक्कम, मोटारसायकल आणि एक मोबाईल असा 1 लाख 90 हजार 100 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या पाच गुन्हेगारांना पुढील तपासासाठी नांदेड ग्रामीण पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंडे, पोलीस अंमलदार मारोती तेलंग, विठ्ठल शेळके, मोतीराम पवार, बजरंग बोडके, महेश बडगु, हेमंत बिचकेवार, संजय केंद्रे, दादाराव श्रीरामे आदींचे कौतुक केले आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेले दोन जबरी चोरीचे गुन्हे स्थानिक गुन्हा शाखेने उघड केले