

नांदेड(प्रतिनिधी)-देशभरात मागील वर्षात 264 पोलीसांनी आपल्या प्राणांची आहुती देत आपल्या भुमिचे, नागरीकांचे, त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करतांना आपल्या जीवापेक्षा आपले कर्तव्य मोठे समजले. अशा या 264 शुरविरांना आज पोलीस स्मृतीदिनी आदरांजली वाहण्यात आली. या अभिवादनात निसर्गाने सुध्दा आपली हजेरी लावली आणि जोरदार पाऊस संपूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत सुरू होता.
21 ऑक्टोबर 1959 रोजी लदाख भागातील 16 हजार फुट उंच असलेल्या हॉट स्प्रिंग या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलांच्या जवानांवर चिनी सैन्याने हल्ला केला. त्या हल्यात 10 जवान धारातिर्थी पडले. तेंव्हापासून 21 ऑक्टोबर हा दिवस हुतात्मा दिन, पोलीस स्मृतीदिन म्हणून पाळला जातो.
या कार्यक्रमात माहिती देतांना पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था राखणे, नागरीकांच्या जिवीताचे व मालमत्तेचे रक्षण करणे ही कर्तव्य पार पाडतांना 264 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विरगती प्राप्त केली आहे. आजपर्यंत जेंव्हढ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपले कर्तव्य पार पाडले त्या सर्वांना नम्र अभिवादन.
या कार्यक्रमात पोलीस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड आणि डॉ.अश्र्विनी जगताप यांनी देशभरात विविध सशस्त्र दलांमधील 264 धारातिर्थी पडलेल्या लोकांची नावे वाचली. सर्व प्रथम पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशीकांत बांगर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, शफकत आमना, पोलीस उपअधिक्षक अर्चना पाटील, डॉ.सिध्देश्र्वर भोरे, चंद्रसेन देशमुख, थोरात, विजय डोंगरे आदींनी पोलीस स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
राखीव पोलीस निरिक्षक विजय धोंडगे यांच्या नेतृत्वात सलामी देण्यात आली. विर जवानांच्या स्मृतीत पोलीस दलाने हवेत तीन गोळ्या झाडून आदरांजली वाहिली. या कार्यक्रमात पोलीस निरिक्षक माणिक बेद्रे, नानासाहेब उबाळे, द्वारकादास चिखलीकर, गजानन सैदाने, डॉ.नितीन काशीकर, सुधाकर आडे, अनिरुध्द काकडे, जगदीश भंडरवार, अशोक घोरबांड यांच्यासह इतर अधिकारी शेकडे, कमल शिंदे, शिवाजी लष्करे, स्नेहा पिंपरखेडे आदी आणि अनेक पोलीस अंमलदार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्र संचलन पोलीस अंमलदार विठ्ठल कत्ते यांनी केले.

महाराष्ट्रातील पहिली बिगुलर महिला पोलीस नांदेडची

पोलीस स्मृती दिनामध्ये एका विशिष्ट पध्दतीने बिगुल वाजवून आदरांजली वाहिली जाते. हा बिगुल वाजविण्याचा प्रकार अनेक कार्यक्रमांमध्ये होत असतो. आजपर्यंत बिगुल वाजविणारी मंडळी ही फक्त पुरूष मंडळी पाहिली होती.आज 21 ऑक्टोबर 2022 रोजी पोलीस मुख्यालय नांदेड येथे विशिष्ट पध्दतीने बिगुल वाजवून आदरांजली वाहण्याच्या कार्यक्रमात तीन जणांमध्ये दोन पुरूष पोलीस आणि एक महिला पोलीस दिसली. त्यांचे नाव वर्षा वाघमारे असे आहे. या बाबत माहिती घेतली असता सांगण्यात आले की, महाराष्ट्रात बिगुल वाजविणारी पहिली पोलीस महिला ह्या वर्षा वाघमारेच आहे. वर्षा वाघमारेचे बिगुल वाजविणे पाहुन याही क्षेत्रात महिलांनी आपली स्थापना केल्याचे पाहुन आनंद वाटला.