नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील विविध महानगरपालिकांच्या हद्दीत पोलीसांना आता मोफत प्रवास करता येणार नाही त्यासाठी त्यांना वाहतुक भत्ता मात्र दिला जाणार असल्याचा शासन निर्णय राज्याच्या गृहविभागाने घेतला आहे. या आदेशावर अपर मुख्य सचिव श्याम तागडे यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
1991 पर्यंत पुणे, कोल्हापूर, सोलाूपर व मुंबई या ठिकाणी पोलीसांना मोफत प्रवास मिळत होता. त्यासाठी संबंधीत परिवहन विभागांना अनुदान उपलब्ध करून देण्यात येत होते. या ठिकाणी काम करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाहतुक भत्ता मिळत नव्हता.
कालानुरूप वाहतुक व्यवस्थेमध्ये अमुलाग्रबदल झाले. बृहन्मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी रेल्वेने किंवा स्वत:च्या वाहनांने प्रवास करत असल्यामुळे बेस्टचा प्रवास बंद झाला. त्यामुळे बेस्टला मिळणारे अनुदान बंद करण्याचा निर्णय झाला. पुढे पोलीस महासंचालकांनी वाहतुकीत झालेल्या बदलांसाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास ऐवजी त्यांना वाहतुक भत्ता देण्याची शिफारस केली होती. त्यामुळे आता पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्यातील महानगरपालिका क्षेत्रांमध्ये बसमधून प्रवास करतांना तो प्रवास विनातिकिट मोफत करता येणार नाही त्यासाठी त्यांना वेतनात प्रवास भत्ता जोडून मिळणार आहे. राज्य शासनाचा हा निर्णय संकेतांक क्रमांक 202210211815164029 नुसार राज्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.
मुंबईसह इतर मनपाक्षेत्रात पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना फुकटाचा बस प्रवास बंद ; मिळणार प्रवास भत्ता