
किनवट,(प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हा शाखेने किनवट तालुक्यात एका गांजा पिकवणाऱ्या शेतावर छापा टाकून तेथून ५२ किलो २८० ग्रॅम गांजा पकडला आहे.पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी आणि आपल्या नूतन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना स्थानिक गुन्हा शाखेने दिवाळीची अशी भेट दिली आहे.
दिनांक २२ ऑक्टोबर २०२२ रोजी नांदेड जिल्ह्यात नूतन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे हजर झाले. नांदेडमध्ये आजी माजी पोलीस अधीक्षक कार्यभार सोपवण्याची प्रक्रिया पूर्ण करत होते.तेव्हाही आपल्या कर्तव्याला सर्वात जास्त महत्व देणारे स्थनिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी भोकरच्या अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीत आपल्या एका पथकाला पाठवले.त्या पथकात सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने,पोलीस अंमलदार दशरथ जांभळीकर,सुरेश घुगे,विलास कदम,मोतीराम पवार हे किनवट येथून या पथकाने पोलीस अंमलदार पांढरे,अनंतवार,कोलबुद्धे यांना सोबत घेतले.
या पथकाने किनवट पासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्रपूर शेत शिवारात गंगासिंग सरीचंद्र साबळे,किशन उर्फ कसन आंदू साबळे आणि बजरंग बच्चनसिंग साबळे यांच्या शेतात छापे टाकले.तेथे प्रतिबंधित असलेल्या अंमली पदार्थ गांजा पेरलेला होता. दुपारी सुरु झालेली हि छापा कार्यवाही रात्री संपली.त्यात एकूण ५२ किलो २८० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.सर्व चार एकर शेतात चोरून चोरून हा गांजा पेरलेला होता.पकडलेल्या गांजाची एकूण किंमत २ लाख ६१ हजार ४०० रुपये असल्याचे तक्रारीत लिहिले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांनी दिलेल्या तक्रारीवरून किनवट पोलिसांनी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातील कलम २०(अ) (ब) नुसार गुन्हा क्रमांक २०३/२०२२ दाखल केला आहे.घटनेची माहिती मिळताच किनवाटचे पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांनी गांजा उगवलेल्या शेतांना भेट दिली आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास किनवटचे पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंखे यांच्या कडे देण्यात आला आहे.
पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी आणि नूतन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थनिक गुन्हा शाखेचे कौतुक केले आहे.
