नांदेड(प्रतिनिधी)-अश्र्वीन कृष्णपक्ष सप्तमीला आजारी रजेवर नांदेड सोडून गेलेले भोकरचे अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे सर हे अश्र्विन कृष्णपक्षाच्या द्वादशीच्या दिवशी पुर्ण बरे झाले आणि एकादशीला कळालेल्या बातमीनंतर द्वादशीला सायंकाळी नांदेड जिल्ह्यात रजेवरून हजर झाले. या सर्व घटनाक्रमात एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे अश्र्वीन कृष्ण पक्षाच्या दशमीच्या दिवशी नांदेडचे पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या बदलीचे आदेश राज्य शासनाने काढले आणि अश्र्वीन कृष्णपक्षाच्या द्वादशीला नुतन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नांदेड जिल्ह्यात पोलीस अधिक्षक पदाचा कार्यभार स्विकारला. आजारी रजेवरून परत आल्यानंतर शासनाच्या निर्णयानुसार विजय कबाडे यांनी सर्व वैद्यकीय प्रक्रिया पोलीस अधिक्षक कार्यालयात दाखल केली की, नाही याबद्दल आज तरी कोणी काही सांगत नाही. या सर्व दिवसांच्या दरम्यान अश्र्वीन कृष्णपक्ष आमावस्येच्या दिवशी सुर्यग्रहण होते. एक ग्रहण संपले तर दुसरे ग्रहण नांदेड जिल्ह्यात तयार झाले.
मराठी महिन्यांमध्ये लिहिलेले वाक्य सर्वांना कळले असतील तरीपण काही शिकलेल्या पण अनाडी लोकांसाठी या मराठी महिन्यांच्या आणि तिथींच्या दिनांक पुढील प्रमाणे आहेत. दि.17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी भोकरचे अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांनी आजारी असल्याची नोंद केली आणि ते उपचारासाठी नांदेडच्या बाहेर रवाना झाले. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी, 20 ऑक्टोबर 2022 रोजी नांदेडचे पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांची बदली झाल्याचे आदेश राज्य शासनाने काढले. त्यांच्या जागी श्रीकृष्ण कोकाटे यांची नियुक्ती झाली. झालेल्या नियुक्तीच्या अनुषंगाने श्रीकृष्ण कोकाटे 22 ऑक्टोबर रोजी सकाळी नांदेडला आले आणि सायंकाळी 4 वाजेपर्यंतच्या कालखंडात नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षक पदाची सुत्रे आपल्या हातात घेतली. प्रमोद शेवाळे यांना सन्मानाने निरोप दिला.
प्रत्येकाचे गुप्त खबरी असतातच असेच खबरी अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांचे पण असतील आणि त्यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार माजी पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयात सन्मान स्विकारून कार्यालयाला राम-राम केला आणि काही तासातच आजारी असलेले विजय कबाडे पोलीस अधिक्षक कार्यालयात हजर झाले. आजारी रजेवरून परत आल्यानंतर काही कागदपत्र संबंधीत घटक कार्यालयात दाखल करण्यासाठी राज्य शासनाने निर्देश जारी केलेले आहेत. त्यानुसार काय आजार झाला होता, कोणत्या डॉक्टरांनी त्यावर उपचार केला, त्या आजारासाठी कोणते “औषध’ दिले, त्या औषधाची बिले आदी कागदपत्र जोडून आपण आजारी रजेवरून परत आल्याचे दाखवायचे असते. पण असे काही घडले आहे काय? याची चौकशी वास्तव न्युज लाईव्हने केली असता त्यास कोणी दुजोरा दिलेला नाही.
प्रमोद हे नांदेड जिल्ह्यातून बदलून गेले आहेत, त्यांच्या जागी श्रीकृष्ण आले आहेत. एक हजार नावांची नामावली कृष्णाची आहे. प्रमोद या शब्दाचा अर्थ आनंद सुध्दा आहे. श्रीकृष्णांची नावेच 1 हजार आहेत तेंव्हा त्याचा अर्थ सांगण्याऐवढी ताकत आमच्याही लेखणीत नाही. पुढे काय होईल, कसे चालेल, कसे नियंत्रण असेल हे येणाऱ्या काही दिवसांत दिसणारच आहे.
अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांचा आजार 5 दिवसांत संपला