2 लाख 34 हजार रुपये किंमतीचे चोरीचे 21 मोबाईल जप्त
नांदेड(प्रतिनिधी)-मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करून फिर्यादीला मोटारसायकलसह ओढत येणाऱ्या दोघांना पकडल्यानंतर वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाने या चोरट्यांकडून चोरीचे 21 मोबाईल किंमत 2 लाख 34 हजार रुपयांचे जप्त केले आहेत.
27 ऑक्टोबर रोजी चंद्रमणी गंगाराम इंगोले यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, 24 ऑक्टोबर रोजी मी हिंगोली गेट येथे फटाके आणण्यासाठी गेलो असतांना दोन माणसे दुचाकीवर आली आणि त्यांनी माझ्या खिशातील मोबाईल चोरत असतांना मी त्यांना पकडले. पण त्या दोघांनी मला फरफटत नेल्यामुळे माझ्या कंबरेला आणि दोन्ही पायांना मुक्का मार लागला आहे. त्या चोट्यांनी माझा मोबाईल तेथेच फेकून दिला होता. वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 374/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 393, 34 नुसार गुन्हा दाखल केला.
घडलेला प्रकार आणि त्याचे गांभीर्य पाहुन पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांच्या मार्गदर्शनात वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे,पोलीस अंमलदार गजानन किडे, विजयकुमार नंदे, शरदचंद्र चावरे, संतोष बेलुरोड, व्यंकट गंगुलवार, शेख इमरान यांनी शैलेंद्र मिलिंद नरवाडे (21) रा.अंबानगर सांगवी, राजरत्न मारोती कदमे(26) रा.अंबानगर सांगवी या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांनी चंद्रमणी इंगोलेचा मोबाईल लुटण्याचा प्रयत्न केल्याचे कबुल तर केलेच सोबतच हिंगोली गेट ते रेल्वे स्टेशन, रेल्वे स्टेशन ते बस स्टॅंड आणि चंदासिंघ कॉर्नर अशा अनेक ठिकाणी त्यांनी चालत्या मोटारसायकलवर अनेकांचे मोबाईल लुटले. असे 21 चोरीचे मोबाईल पोलीसांनी या दोन चोरट्यांकडून जप्त केले आहेत.पोलीसंानी या चोरट्यांनी गुन्हा करतांना वापरलेली 60 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी सुध्दा जप्त केली आहे. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी वजिराबाद गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले आहे.
या गुन्ह्याचे तपासीक अंमलदार पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे आहेत. आज न्यायालयाने दोन्ही मोबाईल चोरांना पोलीस कोठडीत पाठविले आहे.