नांदेड(प्रतिनिधी)-दिवाळीनंतर भाऊबिजेच्या दिवशी जिल्ह्यात जलधारा ता.किनवट येथे आणि मौजे चिरली ता.बिलोली येथे दोन खून घडले आहेत.
मौजे जलधारा येथील रमेश भाऊराव बर्डे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.26 ऑक्टोबरच्या रात्री 8ं.45 वाजेच्यासुमारास बाबाराम रामा झिंगरे यांच्या घरी त्याचे आणि बेगाजी भाऊराव बर्डे (22) यांचे भांडण झाले. बाबाराव झिंगरेने बेगाजी बर्डेचा गळा धरुन त्याच्या अडचणीच्या ठिकाणी पायाने मारुन त्याचा जिव घेतला आहे. बाबाराव झिंगरे आणि बेगाजी बर्डे हे चुलत मेहुणे आहेत. या हल्यात बेगाजी भाऊराव बर्डेचा मृत्यू झाला. ईस्लापूर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 104/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 302 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास ईस्लापूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रघुनाथ शेवाळे हे करीत आहेत. याप्रकरणातील मारेकरी बाबाराव झिंगरेला ईस्लापूर पोलीसांनी अटक केली आहे.
दुसऱ्या एका घटनेत मौजे चिरली ता.बिलोली येथे बालाजी ढगे, कृष्णा ढगे, बंटी ढगे, गोविंद ढगे, सचिन खंडेगावे या लोकांनी मन्मथ इरवंत धोंडापूरे (28) यास तिन दिवसांपुर्वी जिवे मारण्याची धमकी दिली होती. 26 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता या लोकांनी मन्मथ धोंडापुरे सोबत भांडण करून त्याच्या चेहऱ्यावर व डोक्यावर कोणत्या तरी धार-धार शस्त्राने घाव घालून त्याला ठार मारले आहे. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयत मन्मथ धोंडापुरेचे प्रेत बाळासाहेब चव्हाण यांच्या शेतात फेकून दिले आहे अशी तक्रार मन्मथचे वडील इरवंत धोंडीबा धोंडापूरे यांनी दिली. कुंडलवाडी पोलीसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 201, 143, 147, 148, 149 प्रमाणे गुन्हा क्रमांक 119/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास कुंडलवाडीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विश्र्वास कासले हे करीत आहेत.
भाऊबीजेच्या दिवशी रात्री जिल्ह्यात दोन खून