पोलीस होण्याची स्वप्ने बाळगुन ठेवा
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस भरतीची जाहिरात पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. हे आदेश आज 29 ऑक्टोबर 2022 रोजी पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके संजयकुमार यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे.त्यामुळे पोलीस होण्याची स्वप्ने बाळगलेल्या युवक-युवतींना आता पुन्हा वाटच पाहावी लागणार आहे.
दि.27 ऑक्टोबर रोजी पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्य भरातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिक्षक यांना पत्र पाठवून दि.1 नोव्हेंबर रोजी राज्यातील त्या-त्या जिल्ह्याच्या रिक्त पदांच्या आधारावर जाहीरात निर्गमित करण्यास सांगितले होते. त्यानुसार एक आनंदाची लहर युवक-युवतींमध्ये तयार झाली होती. या घटनेला 48 तास पुर्ण होताच 29 ऑक्टोबर रोजी पोलीस महासंचालक संजयकुमार यांनी जारी केलेल्या आदेशानुसार पोलीस भरती जाहिरात जी 1 नोव्हेंबर 2022 अर्थात मंगळवारी देण्याचे आदेश होते. त्या जाहिरातीला स्थगिती देण्यात आली आहे. या संदर्भाने या आदेशात असे नमुद आहे की, जाहीरात देण्याची पुढील तारीख यथा अवकाश कळवली जाणार आहे. हे आदेश राज्यातील 10 पोलीस आयुक्तांना आणि 36 जिल्ह्यांच्या 36 पोलीस अधिक्षकांना पाठविण्यात आले आहेत.
