नांदेड(प्रतिनिधी)-महामार्ग पोलीस केंद्र बारड येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक बालाजी येवते यांना अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) कुलवंतकुमार सारंगल यांनी महामार्ग पोलीस मुख्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई येथील नियंत्रण कक्षात जमा केले आहे.
महामार्ग पोलीस केंद्रात जाण्यासाठी पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार वेगवेगळ्या युक्त्या लढवतात. सध्या वाहतुक विभागाचे अपर पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सारंगल हे आहेत. त्यामुळे महामार्ग पोलीस केंद्रात जाणाऱ्या अधिकारी आणि पोलीस अंमलदारांवर बराच वचक तयार झाला होता. पण तेथे एकदा नियुक्ती झाली की तेथे काय-काय होते हे त्याच ठिकाणी काम करणारे पोलीस अंमलदार मोठ्या चवीने सांगतात. मग अशा चर्चांमुळे त्यांचे नाव समाजात पुढे येते आणि त्यावर वेगवेळ्या वृत्तांना प्रसिध्दी मिळते.
ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सहाय्यक पोलीस निरिक्षक बालाजी येवते यांना वाहतुक विभागाच्या पोलीस मुख्यालयात मुंबई येथे जमा करण्यात आले आहे. ज्यांची सेवा पण आणि अंतिम वेतन प्रमाणपत्र नांदेडच्या पोलीस अधिक्षकांनी अपर पोलीस महासंचालक कार्यालय (वाहतुक) यांच्या कार्यालयात पाठवावे असेही या आदेशात लिहिलेले आहे.
नांदेड जिल्ह्यातील अनेक पोलीस अंमलदार या महामार्ग पोलीस केंद्रात जातात आणि तेथे काही तरी चुकते आणि त्यांना परत संबंधीत जिल्ह्याला पाठवले जाते. सप्टेंबर महिन्यात पोलीस अधिक्षक महामार्ग औरंगाबाद यांनी सुध्दा नांदेड जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांचे पोलीस अंमलदार त्यांच्या मुळ घटकात परत पाठवले आहेत. काही जण सांगतात पोलीस अंमलदारांना परत पाठवल्या बाबत या पोलीस अंमलदारांनी महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण न्यायालयात धाव घेतली आहे. त्याबाबत काय निर्णय झाला हे मात्र समजले नाही.

