
नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अन्न व औषध प्रशासनाने दुपारी 2 वाजेच्यासुमारास मुरमुरागल्ली भागात धाड टाकून लाखो रुपयांचा प्रतिबंधीत आणि अवैध गुटख्याचा साठा पकडला आहे. ही कार्यवाही सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळात झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी अवैध धंदे चालविण्यामध्ये स्थानिक पोलीसांचे संगनमत असू शकते असे वक्तव्य केले होते.
आज दुपारी 2 वाजेच्यासुमारास औरंगाबाद विभागाचे सह आयुक्त वंजारी नांदेड येथील सह आयुक्त कोकडवार यांच्या मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी कनकावाड, एस.व्ही. मरेवार, कावळे, एस.एस. हाके, भिसे, बालाजी सोनटक्के यांच्या पथकाने वजिराबाद पोलीसांच्या काही अंमलदारांसोबत घेवून मुरमुरा गल्ली येथे धाड टाकली. त्या गल्लीत एका छोट्या शटर लावलेली तीन दुकाने अन्न व औषधी प्रशासनाला तपासायची होती. या दुकानांवर तव्वकल ट्रेडर्स असे नाव आहे. ही दुकाने अझीमोद्दीन (37) रा.इकबालनगर परभणी आणि अलीमोद्दीन (33) रा. इकबालनगर परभणी यांची असल्याचे सांगण्यात आले. यातील एक जण पळून गेला आणि एक पोलीसांच्या ताब्यात आहे. चाब्या मिळाल्या नाही म्हणून अन्न व औषधी प्रशासनाने कुलूपे तोडून या दुकानांची तपासणी केली. त्या दुकानांमध्ये लाखो रुपयांचा अवैध, प्रतिबंधीत केलेला गुटखा साठवलेला होता.वृत्तलिहिपर्यंत ही कायदेशीर प्रक्रिया पुर्ण झाली नव्हती. तेथे उपस्थिती असलेल्या लोकांमधील कांही लोकांनी सांगितले की, हा गुटखा जवळपास 25 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा आहे. याबद्दलची कायदेशीर प्रक्रिया अद्याप पुर्ण झाली नव्हती.
ही कार्यवाही सुरू असतांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, एकाच ठिकाणी वारंवार अवैध धंदे चालतात अशा ठिकाणी चालणाऱ्या अवैध धंद्यांमध्ये स्थानिक पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे संगनमत असू शकते आणि अशा सर्वांवर कार्यवाही होणार आहे असे सांगितले होते. आता या प्रकरणात सुध्दा या अवैध गुटख्यातील संगणमत शोधून कार्यवाही केली जाईल अशी आशा जनतेला आहे.



