नांदेड(प्रतिनिधी)-गेल्या 24 तासात जिल्ह्यात अनेक चोरीच्या घटना घडल्या असून त्यात सर्वात मुख्य घटना भोकर-हिमायतनगर रस्त्यावर घडली असून 5 लाख 10 हजारांचा ऐवज बळजबरीने चोरून नेण्यात आला आहे.
रविंद्र लिंगन्ना पोटा रा. तेलंगणा राज्य यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 नोव्हेंबर रोजी त्याच्या जेसीबीचा चालक याने त्याने माहिती दिली की, 10 लाख रुपयांमध्ये 1 किलो सोने मिळवून देतो. त्यांना 5 लाख रुपये घेवून भोकर येथे बोलावले. त्यांना सुध्दा नदीच्या जंगलात नेऊन आपल्या इतर साथीदारांसह त्यांना व त्यांच्या पत्नीला मारहाण करून त्यांच्या जवळचे 5 लाख रुपये व दहा हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल बळजबरीने चोरून नेले आहेत. भोकर पोलीसांनी हा दरोड्याचा गुन्हा क्रमांक 414/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 395 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्यात साईनाथ बाबू देवकर, मास यल्लपा देवकर, रा. वाळकेवाडी ता. हिमायतनगर, विलास बेले, रामु बेले दोघे रा. दत्तबर्डी ता.हदगाव, गजू नरहरी जाधव रा. उमरी, लक्ष्मण वलपवार, लक्ष्मण नारायण धोतरे दोघे रा. किनवट अशा 7 दरोडेखोरांची नावे आहेत. या पैकी साईनाथ बाबू देवकर भोकर पोलीसांच्या ताब्यात आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक सुर्यकांत कांबळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
भोकर शहरात सदानंद जळबा सुर्यवंशी हे शिक्षक 28 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान दिवाळी सणानिमित्त आपल्या मुळ गावी गेले असता कोणी तरी चोरट्यांनी त्यांचे घरफोडून त्यातून 42 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार पांढरे अधिक तपास करीत आहेत.
शिक्षक अंबादास दामोधरराव देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुखेड येथील जिल्हा परिषद शाळा मुलींची यात 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान कार्यालयाचे कुलूप तोडून एक एलईडी चोरून नेण्यात आला आहे. मुखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भारती करीत आहेत.
कोलंबी ता.नायगाव येथे विठ्ठल रुक्मीणी मंदिर कोणी तरी चोरट्यांनी 1 नोव्हेंबरच्या दुपारी फोडले. आई रुक्मीणीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र 2500 रुपये किंमतीचे चोरी करण्यात आले. याबाबत शेषराव दिगंबरराव जोशी यांच्या तक्रारीवरुन नायगाव पोलीसांनी गुन्हा क्रमांक 167/2022 दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक वाघमारे अधिक तपास करीत आहेत. या व्यतिरिक्त जिल्ह्यातून विविध ठिकाणावरून 6 दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत.

