नांदेड(प्रतिनिधी)- सतिश माहेश्र्वरीच्या कार्यालयातून 22 लाख 15 हजार 470 रुपये चोरणाऱ्या दोन चोरट्यांना मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन देसरडा यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.30 ऑक्टोबर रोजी रात्री सन्मान प्रेस्टिज, रेल्वे स्थानक रोड येथील सतिश माहेश्र्वरी या गडगंज श्रीमंताच्या कार्यालयात चोरी झाली. त्यात 22 लाख 15 हजार 470 रुपये चोरीला गेल्याची तक्रार नंदकुमार जळबाजी गाजुलवार यांनी दिल्यानंतर वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 377/2022 दाखल झाला. एखाद्या व्यक्तीचे 5-25 हजार रुपये चोरीला गेले तर तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले अशी विचारणा पोलीस करतात. पण आता 22 लाखांपेक्षा जास्तची चोरी झाली आहे. त्याबाबत आयकर विभागाला पोलीसांनी कळविले की, नाही याबाबत माहिती प्राप्त झाली नाही.या गुन्ह्याचा तपास वजिराबादचे पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे यांच्याकडे आहे.
आज दि.3 नोव्हेंबर रोजी प्रविण आगलावे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार व्यंकट गंगुलवार आणि अमोल दुधभाते यांनी ही चोरी करणाऱ्या शिवदास पुरभाजी सोनटक्के (21) रा. वाघमारगल्ली मुदखेड आणि अंकुश पांडूरंग मोगले (20) रा. धनगर गल्ली मुदखेड दोन चोरट्यांना न्यायालयात हजर केले होते. यांच्याकडून एकूण 17 लाख 41 हजार 400 रुपये पोलीसांनी जप्त केले आहेत. अजूनही 4 लाख 74 हजार 70 रुपये जप्त करणे शिल्लक आहे. याची माहिती देवून न्यायालयाला पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. न्यायाधीश देसरडा यांनी या दोन चोरट्यांना दोन दिवस, अर्थात 5 नोव्हेंबर 2022 पोलीस कोठडीत पाठविले आहे.

