नांदेड(प्रतिनिधी)-एका 14 वर्षीय अल्पवयीन बालिकेला त्रास देणाऱ्या 24 वर्षीय युवकाला विशेष पोक्सो न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी तीन महिने सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
दि.15 फेबु्रवारी 2020 रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेने तक्रार दिली की, त्यांच्या 14 वर्षीय मुलीने शाळेतून आल्यावर सांगितले की, सोमेश भगवान गजभारे (24) हा मला त्रास देत आहे. तिचा नेहमीच तो पाठलाग करतो. तिला बळजबरी बोलवण्याचा प्रयत्न करतो. या संदर्भाने त्या महिलेने सोमेश गजभारेच्या आईला सांगितले तेंव्हा त्या म्हणाल्या माझ्या मुलाने जगा वेगळे काही केले नाही तुम्हाला काय करायचे ते करा मी तुमच्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करते. या तक्रारीनुसार नांदेड ग्रामीण पोलीसांनी 16 फेबु्रवारी 2020 रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम 354(अ) आणि 354(ड) सह पोक्सो कायदा कलम 11 आणि 12 नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पीएसआय रत्नाकर घोळवे यांनी केले.
न्यायालयात हा विशेष पोक्सो खटला क्रमांक 89/2020 या प्रमाणे चालला. न्यायालयात या प्रकरणी सात साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदवले. या प्रकरणातील युक्तीवाद ऐकून न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी सोमेश भगवान गजभारेला तीन महिने सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने ऍड. एम.ए.बत्तुल्ला (डांगे) यांनी सादरीकरण केले. न्यायालयात पैरवी अधिकारी ही भुमिका नांदेड ग्रामीणचे पोलीस अंमलदार फय्याज सिद्दीकी यांनी पुर्ण केली.

