सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी राम गगराणी, त्यांची पत्नी पोलीसांच्या ताब्यात ; मुलाला तीन दिवस पोलीस कोठडी

45 टक्के अपसंपदेचे प्रकरण;झाली होती उघड चौकशी 
नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या उत्पन्नाच्या तुलनेत 45 टक्के जास्त अप संपदा जमवणाऱ्या सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी रामनारायण गगराणीसह त्यांच्या पत्नी आणि मुलाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. आज सायंकाळी 6 वाजेच्यासुमारास प्रथमेश रामनारायण गगराणीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ई. बांगर यांनी तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
                    लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक राजेंद्र हणमंतराव पाटील यांनी आज पहाटे 6 वाजेच्यासुमारास वजिराबाद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी (62), जयश्री रामनारायण गगराणी (57) आणि प्रथमेश रामनारायण गगराणी (34) या तिघांविरुध्द झालेल्या एका उघड चौकशीनंतर त्यांनी 1 एप्रिल 2010 ते 30 जून 2016 दरम्यान आपल्या सर्व कुटूंबियांच्या ज्ञात संपत्तीपेक्षा 45 टक्के जास्त अपसंपदा जमवली आहे. त्याचा एकूण हिशोब 28 लाख 72 हजार 660 रुपये होतो. त्यांच्या पत्नी जयश्री रामनारायण गगराणी यांच्या नावावर 1 लाख 59 हजार 86 रुपयांची अपसंपदा सापडली. तसेच मुलगा प्रथमेश याच्याकडे एकूण मालमत्ता 2 कोटी 7 लाख 51 हजार 740 रुपये बेकायदेशीर आहेे. या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीसांनी गुन्हा क्रमांक 387/2022 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 13(1) (ई) सह 13(2) आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील आरोपी क्रमांक 3 प्रथमेश रामनारायण गगराणीला सायंकाळी 5.42 वाजता अटक झाली. प्रथमेश गगराणीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागा निरीक्षक अशोक इप्पर यांनी न्यायालयात हजर केले. तेंव्हा जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी प्रथमेशला अटक केल्यानंतर त्याच्या घरातील कपाटाच्या लॉकर चॉब्या आरोपीने दिल्या नाहीत. या झाडाझडती मध्ये कोणी रामराव गोविंदराव घारे कडून जमीन खरेदीच्या व्यवहाराचे कागदपत्र सापडले आहेत. त्याची चौकशी करायची आहे. या प्रकरणातील आरोपींनी बेनामी संपत्ती जमवली आहे काय? याचा शोध घेणे आहे. यासाठी पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती केली. आरोपी प्रथमेश गगराणीच्यावतीने ऍड. मनिष रामेश्र्वर शर्मा (खांडील) यांनी पोलीस कोठडी न देण्यासाठी युक्तीवाद केला. युक्तीवाद ऐकून न्या.एस.ई.बांगर यांनी प्रथमेश रामनारायण गगराणीला 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्थात 3 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी आणि त्यांच्या पत्नी जयश्री गगराणी या दोघांना सुध्दा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे येथून ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.
                     अपसंपदेबाबत आलेल्या तक्रारीनंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून गगराणी कुटूंबियांची उघड चौकशी झाली. पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे, अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण, पोलीस उपअधिक्षक शामसुंदर टाक यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील, पोलीस अंमलदार अंकुश गाडेकर, ईश्र्वर जाधव, गजानन राऊत यांनी आपली जबाबदारी पार पाडली.
                         ही माहिती देतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी आपल्या कर्तव्य काळामध्ये भ्रष्टाचार करून अपसंपदा जमवत असेल, शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तसेच त्याच्या लाच मागणीचे मोबाईल फोनवर व्हिडीओ, ऑडीओ असतील आणि भ्रष्टाचार संबंधाने काही माहिती असल्यास ती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला कळवावी. यासाठी प्रत्यक्ष भेट किंवा टोल फ्रि क्रमांक 1064(2), कार्यालयाचा फोन क्रमांक 02462-253512 आणि पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांचा मोबाईल क्रमांक 7350197197 आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा मोबाईल ऍप, संकेतस्थळ आणि फेसबुकपेजवर सुध्दा जनतेने माहिती द्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *