सेवानिवृत्त राम गगराणी आणि त्यांच्या पत्नीला 9 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अपसंपदा जमवलेल्या सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी तथा नांदेड मनपाचे अपर आयुक्त रामनारायण गगराणी आणि त्यांच्या पत्नी जयश्री गगराणी यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी आज सकाळी 9 वाजेच्यासुमारास 9 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. या दोघांचा पुत्र कालपासूनच 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहे.
नांदेड जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, मनपाचे अपर आयुक्त या अनेक पदांवर काम केलेले रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी यांनी आसपासच्या जिल्ह्यात सुध्दा याच पदांवर काम केले.सन 2016 मध्ये सह मनपा आयुक्त असतांना त्यांच्याविरुध्द 1 मार्च 2010 ते 30 जून 2016 दरम्यान म्हणजे पुर्वीच्या काळात सुध्दा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अपसंपदा जमवल्याची तक्रार आली. या बाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने खुली चौकशी प्रस्तावीत केली. या चौकशीत त्यांच्याकडे आपल्या संपत्तीच्या ज्ञात स्त्रोंतांच्या व्यतिरिक्त 45 टक्के जास्त संपत्ती सापडली. ती कायद्यानुसार अपसंपदा ठरली. याबाबत काल सकाळी वजिराबाद पोलीस ठाण्यात रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी(62), त्यांच्या पत्नी जयश्री रामनारायण गगराणी (57)आणि मुलगा प्रथमेश रामनारायण गगराणी (34) या तिघांविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल झाला.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रामनारायण गगराणी आणि जयश्री गगराणी यांना पुणे येथून ताब्यात घेऊन नांदेडला आणले. तर मुलगा प्रथमेश रामनारायण गगराणीला काल सायंकाळी अटक झाली आणि न्यायालयाने त्यास 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले. रामनारायण गगराणी आणि त्यांच्या पत्नी जयश्री गगराणी यांना त्यांच्या अटकेच्या आधारावर आज दि.5 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्यासुमारास न्यायालयात हजर करण्यात आले होते. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक अशोक इप्पर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रामनारायण गगराणी आणि जयश्री गगराणीला न्यायालयात आणले होते.
न्यायालयात रामनारायण गगराणी यांनी नांदेड जिल्ह्यासह इतर अनेक ठिकाणी सह 2010 ते 2016 दरम्यान नोकरी केलेली आहे. त्या प्रत्येक नोकरीच्या ठिकाणी जावून त्यांच्या अपसंपदेविषयी पुरावे गोळा करायचे आहेत असे सांगत पोलीस कोठडीची मागणी केली. या प्रसंगी गगराणी पती-पत्नी आरोपींच्यावतीने नांदेड येथील दुसऱ्या पिढीतले निष्णात ऍड. मनिष रामेश्र्वर शर्मा (खांडील) यांनी पोलीस कोठडी न देण्यासाठी युक्तीवाद केला. काल प्रथमेश गगराणीबद्दल सुध्दा यांनीच युक्तीवाद केला होता. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी आणि त्यांच्या पत्नी जयश्री रामनारायण गगराणी या दोघांना 9 नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
सकाळी 9 वाजता हा रिमांड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीसांनी आणला असतांना सुध्दा न्यायालयात बरीच गर्दी होती. त्यातील काही जण सांगत होते. आपण केलेल्या चुकांची शिक्षा देव देतो ही संकल्पना आता मागे पडली असून देवाकडे असलेल्या कामाच्या व्याप्तीमुळे आपल्या चुकांची शिक्षा इथल्या इथेच तो पोहचवून देतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *