नांदेड(प्रतिनिधी)- राहुल गांधीच्या नांदेड जिल्हा आगमनानंतर पाच किलो मिटरची यात्रा ही मशाल यात्रा असेल. ही यात्रा देगलूर ते वन्नाळी इथपर्यंत जाईल. तेथील गुरुद्वारामध्ये श्री.गुरू नानकदेवजी जयंती निमित्त दर्शन घेवून ही यात्रा पुढे चालेल. देशातील दुसऱ्या स्वातंत्र्य युध्दासाठीची ही यात्रा आता चळवळ झाली आहे. केंद्र शासनाने ई डी आणि सीबीआयच्या भिती तयार करून देशात कोणताही राजकीय पक्ष शिल्लक राहणार नाही यासाठी केलेले प्रयत्न या यात्रेने समाप्तीला येतील असे वक्तव्य कॉंगे्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे यांनी केले.
उद्या दि. 7 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात देगलूर मार्गे प्रवेश करेल. पुर्वीचा वेळ दुपारी 4 वाजता होता. तो आता सायंकाळी 7.30 झाला आहे. देगलूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही यात्रा मशाल यात्रा तयार होईल आणि ती वन्नाळीपर्यंत जाईल. त्या ठिकाणी गुरूद्वारामध्ये दर्शन घेवून ही यात्रा पुन्हा दुसऱ्या दिवसापासून अर्थात 8 नोव्हेंबर पासून मार्गक्रमण करेल अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
या पत्रकार परिषदेत विधी मंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह मोहन जोशी, नसीम खान, हुसेन दलवाई, महिमासिंह आणि कॉंगे्रस नेते उपस्थित होते. या प्रसंगी पुढे बोलतांना अशोक चव्हाण यांनी सांगितले की, चार रात्र आणि पाच दिवस अशी ही यात्रा नांदेड जिल्ह्यात वास्तव्यास असेल. एकूण 14 दिवसांचा भारत जोडो यात्रेचा प्रवास महाराष्ट्र राज्यात आहे. दि.10 नोव्हेंबर रोजी नवा मोंढा मैदानावर राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. या जाहिर सभेत कॉंगे्रसचे अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्र्गेें, प्रकृती स्वास्थ असेल तर शरद पवार, के.सी.वेणूगोपाल, जयराम रमेश, प्रतापगडी आदी नेते त्या सभेस उपस्थित राहतील.
याप्रसंगी बोलतांना बाळासाहेब थोरात म्हणाले की, ही यात्रा म्हणजे सर्व सामान्य माणसांची यात्रा आहे. या पत्रकार परिषदेत बोलतांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे म्हणाले की, या यात्रेच्या सुरूवातील विरोधकांनी केलेली टिंगल टवाळी आम्ही निमुटपणे सहन केली. पण आता विरोधकांच्या पायाखालील वाळू सरकत चालली आहे. काही लोक भारत कोठे तुटला असे सांगतात. पण भारतात न्यायमुर्तीना सुरक्षा मागावी लागत आहे हा प्रकार म्हणजे भारत तुटलेलाच प्रकार आहे. भारताला अन्न देणाऱ्या अन्नदात्यासोबत केंद्र सरकारने धोका केला आहे. सर्वात मोठा सार्वजनिक उपक्रम रेल्वेसह एकूण 23 सार्वजनिक उपक्रम विकले आहेत. पेट्रोल कंपन्या विकल्या आहेत, केंद्र शासन आज जागतिक बॅंकेला भारतात कोणी गरीब शिल्लक राहिलेला नाही असे सांगत आहे. यामुळे गरीबांना न्याय मिळणार नाही. छोटा व्यापारी लुटला आहे. अशा पध्दतीने हा लोकशाही संपवण्याचा प्रकार देशात सुरू आहे. एकही राजकीय पक्ष शिल्लक राहु देणार नाही असे म्हणणे म्हणजे देश तुटलेलाच आहे. कृत्रिम महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीच ही भारत जोडो यात्रा आहे. ईडी आणि सीबीआयची भिती तयार करून केंद्र सरकारने विरोधकांना दाबवण्याचा केलेला प्रयत्न आम्ही जुमानणार नाही असे नाना पटोळे यांनी सांगितले. आमच्या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारला द्यावीच लागतील असे नाना पटोळे यांनी सांगितले.
उद्या रात्री राहुल गांधी मशालींसह भारत जोडो यात्रेचा प्रवास करणार