जीवनात कर्माचे स्थान खुप महत्वाचे आहे. पैसे तुम्हाला कमी जास्त मिळाला तरी चालेल पण माणसे सुखी असतात. अशीच वृत्ती घेवून आपण वर्धा येथे जावे आणि त्या ठिकाणी काम करतांना वास्तव न्युज लाईव्हला सुध्दा तुमची दखल करण्यासाठी बाध्य करावे अशी विनंती अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांना करण्यासाठी हा शब्द प्रपंच.
सन 2013 च्या कालखंडात आपण नांदेडला शहर उपविभागात पोलीस उपअधिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर आपली बदली झाली. आपण काही उपविभाग करून अपर पोलीस अधिक्षक झालात. कबाडे साहेब एका दशकापेक्षा जास्त आपण पोलीस सेवेचा प्रवास केला आहे. या कालखंडात आपल्या जीवनात भरपूर प्रसंग आले असतील त्या सर्व प्रसंगांना उत्तरे देत, त्यांचा सामना करत आपण मार्गक्रमण करत आहोत ही अभिनंदनीय बाब आहे. या कालखंडामध्ये चांगले-वाईट असे अनेक प्रसंग आले असतील. पण जीवनाच्या या प्रवासात आपण एक छोटीशी नदी आहोत. जगात कितीही उर्जा तयार झाली तरी ती समुद्राला सुकवत नाही हे लक्षात ठेवा. काही तरी समुद्राच्या खाऱ्यापाण्यात नक्कीच आहे नाही तर असंख्य गोड नद्या त्याला जावून मिळाल्या नसत्या. जीवनात मार्गक्रमण करतांना काही बाबींना दुर्लक्ष करणे पण शिका. आपण पोलीस दलात आहात. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींचे काय होत असते याचा विचार करा, त्याचा अभ्यास करा, आपण केलेल्या गुन्ह्याचा तपासांना एकदा पुन्हा वाचा तर आपल्याला नक्की लक्षात येईल की आजचा शिक्षेचा दर खुप कमी आहे. का राहतात या कमतरता हा प्रश्न स्वत:ला विचारा मग त्यातून आपल्याल त्याचे सत्य कळेल. जेंव्हा गुन्ह्यांच्या संदर्भाने काही सकारात्मक घडत नाही, प्रतिबंधात्मक उपाय योजना होत नाहीत. तेंव्हा अर्जांनी काय होणार आहे याची पण दक्षता पुढे तरी घ्या. आपल्याला पुढच्या भविष्यात विशेष पोलीस महानिरिक्षक पदापर्यंत जाण्याची संधी आहे. ही संधी सुध्दा एवढी सहजन नाही. या संधीचा उपभोग घ्यायचा असेल तर स्वत:मध्ये अमुलाग्र बदल करण्याची गरज आहे. आपण आता फक्त पोलीस उपअधिक्षक नाही तर वर्धा येथे जावून आपण तिसऱ्या जिल्ह्यात अपर पोलीस अधिक्षक पद भुषविणार आहात. वर्धा जिल्हा महात्मा गांधीजींच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेला आहे. याच गावात बजाज कुटूंबियांनी देशासाठी केलेले काम अधोरेखीत आहे. ग्रामगिता प्रसारीत करणाऱ्या आचार्य विनोबा भावे यांच्या कार्याने या जिल्ह्यात नवीन संस्कृती आणली आहे. अशा जिल्ह्यामध्ये काम करतांना जास्त दक्ष आणि आपल्या कर्तव्याशी एकरुप राहिलात तर प्रगतीचे तुमचे मार्ग कोेणीच खुंटवू शकणार नाही.
समोर तर स्तुती करून घेणारी माणसे आणि अशा मुर्ख माणसांची स्तुती करणारे मुर्ख या जगात भरपूर आहेत. खोटी स्तुती करून घेणाऱ्यांची संख्या सुध्दा कमी नाही. पण अशी खोटी स्तुती काही ठराविक कालावधीसाठीच टिकली जाते. परंतू ज्यांची स्तुती त्यांच्या पाठीमागे केली जाते किंवा त्यांचे नाव घेतले जाते अशा व्यक्तींनी इतरांसाठी काही तरी काम केलेले असते. जे लोक इतरांसाठी व समाजासाठी विधायक कार्य केलेले असतात तेच लोक समाजाच्या हृदयावर राज्य करतात.या विचाराप्रमाणे जगण्याची गरज आहे. सुखाचे गाव शोधता शोधता आपल्या जीवनातील दशकापेक्षा जास्त वेळ समाप्त झालेला आहे. भारतीय आयुष्यमानाच्या अनुरूप विचार केला जातो तेंव्हा वयाच्या 40 नंतर अत्यंत दक्षतेने जगण्याची गरज आहे असे वैद्यकीय मंडळी सांगतात. प्रत्येकाला हवे आहे सुखाचे गाव झटतो त्यासाठी रंक आणि राव पैसा, संपत्ती गोळा करतो त्यासोबत नाव आणि प्रसिध्दीपण हवी असते तरी पण मिळत नाही सुखाचे गाव सर्व काही मिळून लागत नाही ठाव जगाचे परिवर्तन करायला धावतो स्वत: मात्र गडी नामनिराळा राहतो. अशा वृत्तीमुळेच त्या लोकांपासून सुखाचे गाव दुर राहते यासाठीच संत मंडळी म्हणतात “मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव’.
आपल्या जीवनात आपण नेहमीच आभाळाच्या उंची गाठा. मनातले शब्द आणि शब्दातले मन ऐकण्याची कला साध्य करा. नात्यातला जीव्हाळा आणि जिव्हाळ्याच नात दोन्ही जपण्याची कला अवगत करा. डोळे हे तलाव नाहीत तरीपण भरून येतात. अहंकार हे शरीर नाही तरी ते घायाळ होते. दुश्मनी हे बिज नाही तरी पण ती उगवते. ओळ हे कापड नाहीत तरी शिवले जातात. निसर्ग हा बायको नाही तरी पण रुसतोच. बुध्दी ही लोखंड नाही तरी पण तिला गंज लागतो. माणुस हा वातावरण नाही तरी तो बदलला जातो. आपल्याकडे आपल्या मेहनतीने आपण मिळवलेली ताकत आहे. तरीपण बदलण्याची गरज नक्की आहे. कोणाजवळ आपल समर्पण करण्यासाठी अवघड घटना आहे. पण त्या पेक्षा जास्त अवघड आहे की, त्या व्यक्तीला शोधा जो व्यक्ती तुमच्या समर्पणाची कदर करेल.
आम्ही एवढा शब्द प्रपंच लिहितांना सर्व काही खुलेआम लिहिले आहे यामुळे आम्ही विरोधी आहोत हे नक्कीच म्हटले जाईल. पण आम्ही गद्दार आहोत असे कोणी म्हणणार नाही. त्यामुळे आम्ही वाट पाहिली चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी आणि अधिक चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. पण आम्हाला असे सांगण्यात आले की, सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे प्रयत्नांवर अतुट विश्र्वास ठेवतात. माणसाने स्वत:ला कितीही मोठ समजाव पण समोरच्या माणसाला कधीच कमी समजू नका आणि आपल्या जीवनातील कार्यशैलीची आणि त्यातुन समाजासाठी केलेल्या सेवेसाठी अत्यंत मेहनतीने प्रयत्न करा या शुभेच्छांसह वर्धा जिल्ह्यात काम करतांना त्या कामाची दखल वास्तव न्युज लाईव्हला घ्यावी लागेल असे नक्की करा जेणे करून आम्ही फक्त सत्यच लिहितो हे समाजासमोर दाखविण्याची संधी आम्हाला नक्की मिळेल.
विजय कबाडे साहेब आपल्या भविष्यातील जीवनासाठी अत्यंत मनापासून शुभकामना