निलेश मोरे साहेब आपल्या जीवनात सत्य ऐकण्याची पण सवय लावा

लहानपणापासून खरे बोलणे प्रत्येकाला शिकवले जाते. परंतू खरे ऐकावेच लागते याचे शिक्षण मात्र कोणी देत नाही. आज आपल्याला प्रतिक्षेत ठेवण्यात आले असले तरी उद्या कोठे तरी आपली नियुक्ती होणार आहे निलेश मोरे सर तेंव्हा आपल्या पुढच्या जीवनात तरी खरे ऐकण्याची सवय लावा एवढी नम्र विनंती आपल्यासमोर मांडण्यासाठी हा खटाटोप.
नांदेड जिल्ह्यापासून अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी आपल्या पोलीस नोकरीची सुरूवात केली. परिवेक्षाधिन अधिकारी म्हणून आपण नांदेडमध्ये आलात आणि जवळपास 10 वर्षानंतर आपण नांदेडचे अपर पोलीस अधिक्षक म्हणून दोन वर्षाचा कार्यकाळ पुर्ण केलात. या सर्व कालावधीमध्ये आपल्या कक्षात घडणाऱ्या बाबी आपण कोण्या तरी इतराला विचारून त्यावर निर्णय घ्यायचे असा सर्वांचा समज आहे. पाणी पित असतांना आपलीच ओंजळ वापरावी लागते. इतरांच्या ओंजळीने पिलेले पाणी आपल्या तहानेला भागवू शकत नाही. कारण त्या इतराच्या ओंजळीमध्ये बऱ्याच कमतरता असतात. तो आपल्याल त्याची ओंजळ वापरण्यासाठी देत आहे की, ओंजळ देवून तो आपला वापर करत आहे हे ओळखणे खुप महत्वपूर्ण आहे.बुध्दीबळाच्या खेळात आपल्या चालीची भिती त्यांना असते जे राजकारण करतात. यापुढे मात्र आपण या भितीला वगळून कर्माचे खेळाडू व्हा कारण कर्माच्या खेळाडूला न विजयाचा अभिमान असतो ना पराजयाची चिंता असते. कारण त्याला आपले कर्म करायचे आहेत. कर्म करत असतांना फळ देण्याचे काम हे निसर्गाच्या हातात आहे. आपल्याला हवे आहे ते फळ मिळालेच तर आम्ही निसर्गाच्या ताकतीचे होवू पण असे घडत नाही. जीवनाच्या धका-धकीत आपण आनंदी राहा. बाकी सर्व काही चालत राहते. कारण तो आनंद तुमच्या जीवनातील तुमच्या मनावरचा परिणाम ठरतो. मनावर होणारा परिणाम हा आनंदी स्वरुपाचा असेल तर कर्माचे त्यातून वेगळे होेणे खुप काही नाही. जेंव्हा आपण काही करू शकत नाही. तेंव्हा एक मात्र नक्की करा आणि ते म्हणजे प्रयत्न. कारण प्रयत्न केल्यानंतर त्याला कुठे तरी धार येतेच आणि ती धार आपल्या दुखाच्या प्रसंगांना काढून टाकते. दुखाचा अनुभव विचारायचाच असेल निलेशजी तर तो देहाला विचारा मन फक्त निर्णय करत असतो. कर्म देहच करतो. त्यामुळे दु:खाच्या जाणीवेचा दाह फक्त देहालाच माहित असतो.
आपल्या पुढील जीवनात सौंदर्य कपड्यात नसते तर ते कामात असते. सौंदर्य नटण्यात नसते तर ते विचारांमध्ये असते, सौंदर्य भपक्यात नाही तर साधे पणात असते, सौंदर्य बाहेर कुठे नसते तर ते मनात असते. अशा परिस्थितीत सौंदर्याला आपल्या जवळ येण्यापासून रोखु नका. इतरांच्या सांगण्याने जीवनात सौंदर्य येत नाही. विचारवंत सांगतात की, तुमच्या सोबत कितीही लोक असले तरी परंतू संघर्ष स्वत:ला करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वत:ला भक्कम बनवा. कारण आजच्या जगात खऱ्या माणसाला खोट्या माणसापेक्षा जास्त स्पष्टीकरण द्यावे लागते अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीत खोटारड्या जगाशी भांडतांना तुमचा भक्कमपणा त्यासाठी मोठी ढाल आहे.आयुष्य आपलंच आहे निलेशजी पण ते जगायच इतरांसाठी आहे. जगातल्या प्रत्येक माणसाला निसर्गाने एकाच मातीने बनवले आहे.त्यात फरक एवढाच की कोणी बाहेरुन सुंदर आहे तर कोणी आतल्या बाजूने सुंदर आहे. आम्हाला विनंतीच करायची आहे की, आतल्या बाजूने सुंदर व्हा. तुम्हाला पाहताच पाहणाऱ्यांच्या मनात आनंदाचा उद्रेक व्हायला हवा. कारण आपल्याला भरपूर पुढे जायचे आहे. निलेशजी कमी वयात माणुस असाच समजदार होत नाही. काहींना लोक समजदार बनवतात तर काहींना परिस्थिती बनवते. समजदारीची भाषा तेच वापरतात ज्यांनी कमी वयात जास्त वाईट दिवस पाहिलेले असतात. म्हणूनच खोटी स्तुती करून घेण्यामध्ये महत्व नाही तर आपल्या बदलीनंतर लोकांना रडू आले पाहिजे ती अश्रुंची स्तुती आहे आणि महत्वपूर्ण त्या अश्रुच्या भावना आहेत. विचारवंत सांगतात मोठ्या लोकांनी दिलेले उपदेश चौकात लावलेल्या लालबत्तीसारखे असतात. कारण त्यातून वाईट काही होत नाही तर जीवनात होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी त्या लालबत्तीचा उपयोग होतो.
पुढच्या जीवनात आपण उंच सिडी चढणार आहात अशा वेळी मागे सुटणाऱ्या लोकांबरोबर आपले व्यवहार उत्तम ठेवा कारण उंच सिडीवरून खाली उतरतांना रस्त्यामध्ये ही सर्व मंडळी तुम्हाला भेटणार आहे. जगाला सुधारण्यासाठी भाषण दिले जातात. ही खोटी चेष्टा आहे स्वत:मध्ये परिवर्तन आणण्याची गरज असते आणि तीच स्वत:साठी इमानदारी असते. दोन अक्षरांचे लक, अडीच अक्षरांचे भाग्य आणि तिन अक्षरांचे नशीब उघडण्यासाठी चार अक्षरांची मेहनतच उपयोगात येते.एक शब्दाचा मी पणा आपल्या जीवनाला नष्ट करत असतो. आपण पोलीस आहात कधी उच्च न्यायालयात गेला असतालच. तेथे न्यायमुर्ती आपल्या डोक्यापेक्षा उंच बसलेले असतात. दोन वकील माझे म्हणणे कसे खरे आहे हे बोलतांना वेगवेगळ्या शब्दांवर वेगवेगळ्या प्रकारचे कंपन तयार करतात. सोबत दोन वकील न्यायमुर्तींपुढे वेगवेगळ्या पुस्तकांचे संदर्भ सादर करतात. पण न्यायमुर्ती कधीच म्हणत नाही की, मला कायदा शिकवतात काय? दोघांचा वेळ खाऊ युक्तीवाद ऐकल्यानंतर फक्त एकच वाक्य म्हणतात प्रकरण निकालासाठी राखीव. या शब्दांमध्ये भरपूर मोठा मतीतार्थ आहे. आपण त्यातून काही तरी घ्यावे आणि आपल्या जीवनातील प्रकरणांना सुध्दा निकालासाठी कधी राखीव ठेवावे अशी आमची अपेक्षा आहे. आपल्या जीवनाचा भविष्यकाळ गरीबांचे अश्रु पुसण्यासाठी वापरला जावा याच शुभकामना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *