नांदेड(प्रतिनिधी)-मनपाचे सेवानिवृत्त अपर आयुक्त आणि अपर जिल्हाधिकारी रामनारायण गगराणी त्यांच्या पत्नी जयश्री गगराणी आणि पुत्र प्रथमेश गगराणी या तिघांना विशेष न्यायाधीश एस.ई. बांगर यांनी जामीन नाकारला आहे. गगराणी कुटूंबियांना आता पुढचे दिवस तुरूंगात मुक्काम करावा लागणार आहे.
दि.4 नोव्हेंबर रोजी आपल्या संपत्तीच्या ज्ञात स्त्रोतांऐवजी 45 टक्के जादा अपसंपदा जमवल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला होता. त्याच दिवशी प्रथमेश गगराणीला अटक झाली आणि न्यायालयाने 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले. त्या रात्री रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी आणि त्यांच्या पत्नी जयश्री रामनारायण गगराणी यांना अटक झाली.5 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर अशी पोलीस कोठडी पत्ती-पत्नीला देण्यात आली होती.7 नोव्हेंबर रोजी प्रथमेश गगराणीची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडी वाढवून दिली होती.
आज तिघांची पोलीस कोठडी संपल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक अशोक इप्पर आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी तिघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयात एसीबी पोलीसांनी वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली होती. पण न्यायालयाने ती अमान्य केली. त्यानंतर तिघांचा जामीन अर्ज सुनावणीसाठी आला. त्यावेळी पोलीसांनी सध्या तपास सुरू आहे, यांना जामीन दिला तर हे परत येणार नाहीत असे मुद्दे न्यायालयासमक्ष मांडले. आरोपींच्यावतीने ऍड.मनिष रामेश्र्वर शर्मा (खांडील) आणि ऍड. अमित डोईफोडे यांनी भरपूर मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करून जामीन द्यावी असा युक्तीवाद केला. युक्तीवाद ऐकून न्या.एस.ई.बांगर यांनी सध्या तपास सुरू आहे अशी नोंद निकाल पत्रात करून रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी, त्यांची पत्नी जयश्री गगराणी आणि पुत्र प्रथमेश गगराणी या तिघांना जामीन नाकारला आहे. त्यामुळे या तिघांचे पुढील वास्तव्य तुरूंगात होणार आहे.
राम गगराणी, पत्नी आणि पुत्राला तुरूंग वास्तव्य