आम्हाला अर्थात कॉंगे्रसला शिव्या दिल्याशिवाय मोदीजींचे पोट भरत नाही-खा.खरगे
नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी भितीला घृणेत बदलातात आणि त्या बदलाविरुध्द मी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. भारत जोडो यात्रामध्ये चालणे अवघड नसुन सहज आहे. कारण त्यात जनतेची मदत आहे. त्यांच्या मदतीनेच मी पुढे ढकलला जातो. मी स्वत: चालत नाही असे प्रतिपादन कॉंगे्रस नेते राहुल गांधी यांनी केले.
7 नोव्हेंबर पासून नांदेड जिल्ह्यात आलेली भारत जोडो यात्रा आज नांदेड शहरात पोहचली. त्यानंतर सायंकाळी नवा मोंढा मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत कॉंगे्रसचे पक्ष अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे, के.सी.वेणुगोपाल, दिग्वीजयसिंग, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात, नाना पटोळे, अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. राहुल गांधीच्या आगमनापुर्वी मनोरंजन, गितगायन, नृत्य आदी प्रकार सुरू होते. देगलूर नाका येथून नांदेड शहरात प्रवेश केलेल्या भारत जोडो यात्रेला शहरभर उत्तम प्रतिसाद मिळाला होता. रस्त्यांच्या आजूबाजूने लोकांची गर्दी जमलेली होती. या गर्दीसोबत राहुल गांधींनी अनेक जागी संवाद साधला.
याप्रसंगी पुढे बोलतांना राहुल गांधी म्हणाले, आपण ज्या महापुरूषासमोर नतमस्तक होतो, त्यांच्यासमोर हात जोडतो, त्यांना पुष्पअर्पण करतो हे त्यांनी समाजासाठी केलेल्या तपस्येचा परिणाम आहे. आजच्या परिस्थितीत शेतकरी, कामगार हे सुध्दा तपस्वी आहेत. पण त्यांना आपल्या तपस्येचे फळ मिळत नाही. पुर्ण फायदा वेगळेच लोक घेतात. मोदीजी पण तपस्वी आहेत. पण त्यांची तपस्या वेगळ्या पध्दतीची आहे. जी आपण अश्रुंच्या माध्यमातून आपण पाहिली आहे.
स्वतंत्र भारतात पहिल्यांदा शेतकऱ्याच्या प्रत्येक साहित्यावर कर लावण्यात आला. मी 3570 किलो मिटर चालत आहे. हे चालणे अवघड नसून अत्यंत सहज आहे. ही सहजता मला जनतेच्या प्रेमामुळे प्राप्त झाली. त्यांचे प्रेम मला पुढे ढकलत राहते. मी स्वत: चालतच नाही. देशाची संपत्ती दोन-तीन उद्योगपतींच्या घरात जात आहे. म्हणून भारताच्या शाळांमध्ये संगणक उपलब्ध नाही. देशात पैशांची कमतरता नाही. पण तो पैसा जनतेसाठी वापरला जात नाही. उलट त्यांच्याकडे अर्थात शासनाकडे जनतेच्या खिशातून पैसे उकळण्याचा पंप लावलेला आहे. जीएसटी आणि नोटबंदी यामुळे सर्वसामान्य माणसाला रोजगार देणारा कणा या सरकारने मोडून काढला आहे. देवाजवळ काय मागाचे आणि काय नाही याचे एक उदाहरण सांगतांना राहुल गांधी यांनी केदारनाथ यात्रेचा उल्लेख केला ही यात्रा त्यांनी पायी केली होती आणि त्या यात्रेतूनच या देशभराच्या यात्रेचा पाया रोवला गेला असे राहुल गांधी म्हणाले. कॉंगे्रस पक्ष बोलण्यापेक्षा करुन राखवण्यावर भर देत असतो असे सांगत ज्या महापुरूषांनी भारताला जीवनाचा रस्ता दाखवला त्या महापुरूषांना अभिवादन करून राहुल गांधी यांनी सभेचा निरोप घेतला.
या कार्यक्रमात प्रास्ताविक भाषण करतांना अशोक चव्हाण म्हणाले नितीन गडकरी यांनी सांगितले आहे की, भारताच्या अर्थ व्यवस्थेची सुधारणा करण्यात सर्वात जास्त सहभाग माजी पंतप्रधान मनमोहनसिंघ यांचा आहे. पुर्वी राजकारणात पक्ष संपविण्याची भुमिका कधीच नव्हती. पण आता फायद्याचे गलीच्छ राजकारण सुरू झाले आहे. भारतात अनेक प्रश्न आहेत. त्यात पिक विमा हा केंद्र सरकारचा प्रश्न आहे. तरीपण त्यावरील उपाय योजना या तकलादू आहेत.
या सभेत कॉंगे्रसचे अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांनी सर्वसामान्यपणे हिंदीत बोलणे सुरू केले. पण बहुतेक भाषण त्यांनी मराठी भाषेत केले. कर्नाटक राज्यातील खरगे यांच्यावर मराठी मातेचा प्रभाव आहे हे आवर्जुन जाणवले. आजच्या परिस्थितीत देशाचे संविधान वाईट परिस्थितीत आहे. कोठे आहेत 18 कोटी नोकऱ्या असा प्रश्न विचारुन केंद्र शासन युवकांची दिशाभुल करत असल्याचे सांगितले. कॉंगे्रस सरकारने 400 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर दिले आज त्याचे 1100 रुपये मोजावे लागत आहेत असा उल्लेख केला. पंडीत नेहरुंनी तयार केलेले अनेक सार्वजनिक उपक्रम विक्री होत आहेत. ज्यात विमानतळ, रस्ते आणि पुढे रेल्वे विक्री होणार आहे असे खरगे म्हणाले. 50 टक्के लोकांकडे देशाची 13 टक्के संपत्ती आहे. तर 1 टक्के लोकांकडे फक्त 22 टक्के संपत्ती आहे. याप्रसंगाला काय म्हणावे.आम्हाला अर्थात कॉंगेे्रसला शिव्या दिल्याशिवाय मोदीजींचे पोटच भरत नाही. आपल्याला शिव्या देणारे हवेत की, देशसेवा करणारे हवेत असा प्रश्न मल्लीकार्जुन खरगे यांनी जनतेला विचारला. सोनीया गांधींनी पंतप्रधान पद नाकारले, राहुल गांधींनी अध्यक्ष पद नाकारले येथे आम्ही सरपंच आणि नगरसेवक पदासाठी भांडतो असा उल्लेख खरगे यांनी केला. देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठीच सोनिया गांधींनी स्वत: पंतप्रधान पद नाकारून मनमोहनसिंघांना पंतप्रधान केले होते. आम्ही सर्व काम करणारी मंडळी आहोत. यापुढे सुध्दा राहुल गांधी सांगतील ते सर्व काम आम्ही करणार आहोत. आता मोदी-मोदी शब्द ऐकून लोकांना कंटाळा आला आहे. कॉंगे्रस पक्षावर आरोप केला जातो की, आम्ही देशाला बरबाद केले. याचे उत्तर देतांना खरगे म्हणाले की, आम्हीच खऱ्या अर्थाने देशाचे संविधान वाचवले, लोकशाही वाचविली आणि त्यामुळेच नरेंद्र मोदी पंतप्रधान होवू शकले. आम्ही लढलो तरच आम्ही जिंकणार आहोत याबाबत सविस्तर बोलतांना खरगे म्हणाले की, आम्ही कोणाला भिती दाखवली नाही आणि आम्ही भिणारपण नाही. याचा उल्लेख करतांना मल्लीकार्जुन खरगे यांनी दशम पातशाह श्री गुरूगोविंदसिंघजी महाराज यांचा उल्लेख केला.
याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील म्हणाले या भारत जोडो यात्रेतून समोर येणाऱ्या घटनांमुळे सर्व व्यक्ती एकत्र आले आहेत. मुठभर मिठ उचलण्यासाठी गांधीजींनी दांड यात्रा केली होती. त्यानंतरच भारताच्या स्वातंत्र्याचा बिगुल वाजला होता. या भारत जोडो यात्रेनंतर नवीन स्वातंत्र्याची पहाट आमची असेल, उद्याचा दिवस आपला आहे असा उल्लेख केला. याप्रसंगी बाळासाहेब थोरात म्हणाले या यात्रेतून सकारात्मक उर्जा निर्माण होत आहे. भविष्यात कधी भारताचा ईतिहास लिहिला जाईल तेंव्हा या भारत जोडो यात्रेचा उल्लेख नक्कीच त्या ईतिहासात केला जाईल. आजच्या परिस्थितीत लोकशाही वाचविण्याचा प्रयत्न सर्वात मोठा आहे. याप्रसंगी विशालसिंह नावाचे अभिनेते म्हणाले की, प्रेमात सर्व काही हरलो तरच विजय आपला होतो. याप्रसंगी नाना पटोळे म्हणाले मोदीजी करतात तो ईव्हेंट आहे आणि राहुल गांधी करत आहेत ती मुव्हमेंट आहे. याचा उल्लेख करतांना नाना पटोळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातृभेटीचा उल्लेख आवर्जुन केला. यासभेचे आभार व्यक्त करण्याची जबाबदारी गोविंदराव नागेलीकर यांनी पार पाडली.

राहुल गांधीचे व्यासपीठावर आगमन होताच व्यासपीठापासून भरपूर दुर फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली. या आतिषबाजीमुळे त्या ठिकाणी सभा ऐकण्यासाठी आलेल्या अनेक लोकांना रिकाम्या खुर्च्या आपल्या डोक्यावर ठेवून स्वत:चा बचाव करावा लागला. त्या ठिकाणी टाकलेले अनेक मॅटिंग या आषिबाजीच्या ठिणग्यांनी अनेक ठिकाणी जळाल्या.

सभेत आलेल्या सर्व लोकांना त्या ठिकाणी एक पत्रक वाटप करण्यात आले. त्यामध्ये भारत जोडो यात्रा, त्याचे उद्देश आणि त्याची गरज या पत्रकात लिहिलेली आहे. या पत्रकाच्या दुसऱ्या बाजूला मथळ्यात “हम दो, हमारे दो’ चे चक्रव्युह तोडा, भारत जोडा असे शब्द लिहिले आहेत. हम दो हमारे दोचा नारा सुध्दा कॉंगे्रस पक्षाचाच आहे. आता ते चक्रव्युह तोडा म्हणजे दोन पेक्षा जास्त संतती जन्म द्या असा त्याचा अर्थ आहे काय अशी चर्चा त्या ठिकाणी उपस्थिती नागरीकांमध्ये होत होती.