नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने जबरी चोरीचा गुन्हा काही तासातच उघड केला. सोबतच चोरट्यांकडून 1 लाख 78 हजार रुपयांचा चोरीचा ऐवज जप्त केला. तसेच गुन्हा करणाऱ्यासाठी वापरलेला 1 लाख रुपये किंमतीचा ऍटो सुध्दा जप्त केला.
दि.10 नोव्हेंबर रोजी सिध्दांत नारायणराव टाक(30) रा.वसमत जि.हिंगोली हे आयटीआय जवळील हॉटेल गोदावरीमध्ये जेवन करून परत जात असतांना एक अनोळखी ऍटो चालक आणि त्याच्या सहकाऱ्याने तुम्हाला घरी सोडतो असे सांगत सिध्दांत टाक यांना बळजबरीने ऍटोत बसवले. पोलीस ठाणे शिवाजीनगरच्या पाठीमागे नाना नानी पॉर्कजवळ नेऊन अंधारात ऍटो थांबला आणि सिध्दांत टाकला खाली उतरवून त्यांच्याकडील 1 लाख 60 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल आणि 18 हजार रुपये किंमतीचा ब्लुटूथ असा एकूण 1 लाख 78 हजार रुपयांचा ऐवज लुटला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक 400/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 392, 34 नुसार दाखल झाला. घडलेली घटना पोलीस ठाण्याच्या पाठीमागे असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य जास्त होते.शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर यांनी त्वरीत प्रभावाने आपल्या पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, त्यांच्यासह पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार शेख इब्राहिम, दिलीप राठोड, रविशंकर बामणे, देवसिंग सिंगल, शेख अजहर आणि दत्ता वडजे यांना कार्यान्वीत केले. पोलीस पथकाने काही वेळातच विशाल शेषराव सोनकांबळे (23) या ऍटो चालकास ताब्यात घेतले. त्याच्याकडून बळजबरी चोरलेले दोन मोबाईल, एक ब्लुटूथ आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेला ऍटो रिक्षा असा एकूण 2 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांनी शिवाजीनगर पोलीसांनी अत्यंत कमी वेळेत एक गंभीर गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पाठीमागे घडलेला जबरी चोरीचा गुन्हा शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने काही तासातच उघड केला