आपल्या अधिकारासह कर्तव्याची भावना ही जागृत समाजाचे लक्षण – जिल्हाधिकारी अभिजित राऊत   

नांदेड (प्रतिनिधी)-शासकीय योजनांपासून जे वंचित आहेत त्या वंचितापर्यंत पोहचण्याची जबाबदारी ही शासकीय यंत्रणेची आहे. एखाद्या योजनेचे फलित हे त्या संबंधित शासकीय यंत्रणेचे प्रमुख जेवढ्या जबाबदारीने आणि कर्तव्य भावनेने आपली जबाबदारी पार पाडतात त्यावर अवलंबून असते. लोककल्याणकारी योजनांची भूमिका अधिक दृढ होण्याच्या दृष्टिने हा भव्य लोककल्याणकारी योजनांचा महामेळावा महत्वाचा आहे. याद्वारे नागरिकांच्या अधिकारांसह कर्तव्याप्रती होणारी जागृती ही प्रशासनाच्यादृष्टिने अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.
लोककल्याणकारी राज्यात न्याय व्यवस्था फक्त अन्यायाला दाद देण्यापुरती नसून लोकांच्या दारापर्यंत जाऊन न्याय देणारी आहे या शब्दात त्यांनी आपल्या न्यायव्यवस्थेबद्दल गौरउद्गार काढले. लोकअदालत व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे असे उपक्रम हे सुदृढ न्याय व्यवस्थेचे द्योतक असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाचे सर्व विभाग अत्यंत जबाबदारीने कर्तव्य तत्पर असून महानगरपालिका व इतर विभाग प्रमुखांनी या मेळाव्यासाठी दिलेल्या योगदानाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
जिल्हा पोलीस दलाचे स्टॉल ठरले आकर्षण मोबाईलच्या माध्यमातून घरोघरी आर्थिक व बँकिंग व्यवहाराबाबत व्याप्ती वाढणे हे एका अर्थाने प्रगतीचे लक्षण मानले पाहिजे. तथापि मोबाईलची ही क्रांती हाताळतांना बँकिंग प्रणालीबाबत व फसव्या जाहिरातींना बळी पडणाऱ्यांची संख्या वरचेवर वाढत आहे. यात आर्थिक गुन्हेगारीचा झालेला शिरकाव रोखण्यासाठी प्रत्येक मोबाईल वापर कर्त्याने सावध झाल्याशिवाय पर्याय नाही. यादृष्टिने पोलीस विभागातर्फे स्वतंत्र स्टॉल लावून जागृती करण्यात आली. याचबरोबर महिलांच्या संरक्षणासाठी भरोसा सेलचा स्टॉल महिलांच्या मनातील भिती दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला. हा सेल आमच्या मैत्रीणी सारखा असल्याच्या प्रतिक्रिया महिलांनी दिल्या.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण, कृषि, आरोग्य, महिला बचतगट, ग्रामीण विकास यंत्रणा, सामाजिक न्याय विभाग, पशुसंवर्धन, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा महिला व बाल संरक्षण कक्ष, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, निवडणूक शाखा, भारतीय डाक विभाग, दिव्यांग योजना, प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान आदी योजनांच्या लाभार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *