राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत नांदेड पोलीसांनीच नव्हे तर ज्या-ज्या ठिकाणातून ती यात्रा नांदेडला आली आणि पुढे कश्मिरपर्यंत जाणार आहे. त्या सर्व पोलीसांचे कौतुक करणे आवश्यकच आहे. व्हीआयपी बंदोबस्त करत असतांना त्यांच्या सुरक्षेची काळजी आपल्या जीवापेक्षा जास्त घेणाऱ्या पोलीसांनी या दिवसांमध्ये केलेली मेहनत वाखाणण्यासारखी आहे. नांदेडचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, माजी पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, आजचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि त्यांच्या असंख्य पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी घेतलेली मेहनत डोळ्याचे पारणे फेडणारी होती.
7 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी नांदेड जिल्ह्यात आले. या यात्रेचे मार्ग, त्यांच्या थांबण्याच्या जाग, त्या ठिकाणी असणारी सोय, आवश्यक असणाऱ्या गरजांच्या बाबी या सर्वांचे नियोजन खुप पुर्वीपासून सुरू होते. त्यात पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, माजी पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांचा सिंहाचा वाटा होता. तेलंगणा पोलीस आणि नांदेड पोलीस यांच्या अनेक संयुक्त बैठका झाल्या आणि या यात्रेचा प्रवास सुखकर कसा करता येईल यावर भरपूर विचारमंथन झाले.या विचार मंथनातून समोर आलेल्या घटनाक्रमांना पोलीसांनी आपल्या कामात सहभागी केले आणि या कामांमुळे त्यांना योग्य दिशा मिळाली आणि या दिशेतून त्यांनी आपल्या जबाबदारीला अत्यंत कर्मठपणे पार पाडले. बिलोलीचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक आणि देगलूरचे पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे यांनी राहुल गांधींच्या आगमनापासून नांदेड पोलीस परिक्षेत्र पार करेपर्यंत या भारत जोडो यात्रेचे कासरे सांभाळले होते.
गांधी घराण्यातील प्रत्येक व्यक्तीशी ही सवय होती आणि आहे की, जनतेत भेट देणे आणि त्यातून सुरक्षेची होणारी परवड न पाहणे, यामुळे धोकापण झालेला आहे. गांधी घराण्यातील दोन सदस्यांची हत्या करण्यात आली.भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु हे पंतप्रधान झाल्यावर पहिल्यांदा काश्मिरला गेले होते. तो प्रसंग तर भयानकच होता. दुतर्फा उभे राहिलेल्या 1000 जवांनानी बंदुकावर करून ठेवल्या होत्या आणि त्या बंदुकांच्याखालून पंडित नेहरुजींनी पायी प्रवास केला होता. रस्त्यात त्या जवांनांनी बंदुकातून गोळ्यापण झाडल्या. काय अवस्था झाली असेल सुरक्षा रक्षकांची ते सर्व जवान फारुक अब्दुला यांचे वडील शेख अब्दुला यांचे समर्थक होते. त्यानंतर काश्मिर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला होता आणि शेख अब्दुला त्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले होते. राहुल गांधींनी सुध्दा कन्याकुमारीपासुर सुरू केलेला हा भारत जोडो यात्रेचा प्रवास आणि असे जनतेत मिसळण्याचे प्रकार अनेक जागी केले. प्रत्येक ठिकाणी सुरक्षा रक्षकांची तारांबळ झाली. त्यातल्या त्यात स्थानिक पोलीसांची तर परिस्थिती न सांगण्यासारखी आहे.पुढे हा प्रवास काश्मिरपर्यंत जाणार आहे आणि अशा घटना बऱ्याच जागी घडतील.
नांदेड जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, देगलूरचे पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे यांनी घेतलेली मेहनत न झोपता, न जेवण करता, कोणताही उसासा न मिळवता केली आहे. या सर्वांना आज सायंकाळी उसंत मिळणार आहे. 7 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर या कालखंडात पोलीस अंमलदारांमधील महिला पोलीस अंमलदारांनी सुध्दा खुप मेहनत घेतली आहे. जी महिला पोलीस अंमलदार मंडळी देगलूर ते चौरंबा या पायी प्रवासात होती त्यांची तर करावी तेवढी प्रशंसा कमी आहे.
नांदेडमधील एक प्रसंग आम्ही लिहुन पोलीसांची मेहनत सांगू इच्छीतो. देगलूर नाका येथे राहुल गांधींनी सुरक्षा वर्तुळ तोडून जवळपास 500 मिटर पुढे गेले आणि या काळात त्यांच्या सुरक्षेतील पोलीसांच्या हातातील दोरखंड त्यांच्याच चार चाकी वाहनाच्या चाकात अडकला.यामुळे तीन खाजगी माणसे खाली पडलेला व्हिडीओ सामाजिक संकेतस्थळांवर व्हायरल झाला. याच घटनेत लोहाचे पोलीस निरिक्षक संतोष तांबे आणि काही पोलीस अंमलदारांना सुध्दा खुप मार लागला. तरी पण त्यांनी आपली जबाबदारी आपल्या जखमांवर उपचार करण्यापेक्षा जास्त महत्वाची होती हे जाणून घेतले आणि आपल्या जखमांकडे दुर्लक्ष करून यात्रा सुरक्षीत पुढे कशी जाईल यावरच काम केले.यांची प्रशंसा केली नाही तर आम्ही आमच्या लेखणीसोबत बेईमानी केल्यासारखे होईल आणि आम्हाला ती बेईमानी भुतकाळातही पसंत नव्हती आजही पसंत नाही आणि भविष्यात सुध्दा पसंत राहणार नाही.
नांदेड जिल्हा पोलीसांची प्रशंसा लिहुन आम्ही पाणी मारत नाहीत, सत्य लिहित आहोत. आज नांदेड पोलीस परिक्षेत्रातील पोलीसांनी थंडगार श्र्वास घेतला असेल. त्यांच्या मदतीला औरंगाबाद पोलीस परिक्षेत्रातील पोलीस आले होते. बॉम्ब शोध व नाशक पथकाची तर किती पथके आली होती याची संख्याच उपलब्ध नाही. अनेक श्र्वान पथक 200-300 किलो मिटरवरून या बंदोबस्ताची देखरेख करण्यासाठी आले होते. राहुल गांधींच्या सुरक्षेनुसार त्यांच्या तपासणीनंतरच राहुल गांधींना पुढे जाण्याची परवानगी मिळते. या सुरक्षा व्यवस्थेला कोचका देवून सुरक्षा वर्तुळाच्या बाहेर जाण्याची गांधी घराण्याची प्रथा राहुल गांधींनी सुध्दा कायम ठेवली. परंतू पोलीसांनी डोळ्याची पापणी सुध्दा लवणार नाही अशा पध्दतीने भारत जोडो यात्रेच्या बंदोबस्तासाठी घेतलेली मेहनत नक्कीच प्रशंसनिय आहे.
पोलीसांच्या भौतिक सोयींकडे दुर्लक्ष
देगलूर ते नांदेड आणि पुढे चोरंबा या एवढा पायी प्रवास नांदेड जिल्ह्यातून करतांना राहुल गांधी यांनी चार मुक्काम केले. या सर्व ठिकाणी पोलीसांच्या राहण्याची अत्यंत दुर्देवी अवस्था होती. एखाद्या शाळेच्या खोल्यांमध्ये त्यांना राहण्याची सोय होती आणि तेथे असलेल्या अत्यंत तोकड्या भौतिक सुविधांमध्ये सुध्दा पोलीसांनी वास्तव्य करून आपल्या कर्तव्याला मात्र प्रथमस्थान दिले.राहुल गांधींच्या राहण्याच्या जागांना कॅम्प 1, कॅम्प2 आणि कॅम्प 3 अशी नावे होती. या कॅम्पमध्ये असणाऱ्या सुविधा पाहिल्या तेेंव्हा त्या जवळपास पंचतारांकितच होत्या. त्या सुविधा तयार करण्यासाठी असंख्य लोकांनी हातभार लावला. पण पोलीसांच्या सुविधांसाठी कोणीच हातभार लावला नाही हे सुध्दा तेवढेच सत्य आहे. याही परिस्थिती पोलीसांनी आपल्या कर्तव्याला दिलेली प्रथम पसंती अत्यंत उल्लेखनिय आहे.