नांदेड(प्रतिनिधी)-11 नोव्हेंबर रोजी आकस्मात मृत्यू दाखल झालेल्या प्रकरणात बिलोली पोलीसांनी मयताच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार एका व्यक्तीविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. दि.12 नोव्हेंबर रोजी मारोती लालप्पा खुळगे यांनी दिलेल्या खबरीनुसार 11 नोव्हेंबरच्या सायंकाळी 4 ते 12 नोव्हेंबरच्या दुपारी 12.45 दरम्यान बिलोली ते कुंडलवाडी जाणाऱ्या रस्त्यावर नागनाथ तुमोड यांच्या शेतातील अंब्याच्या झाडाला एक पुरूष जातीचे प्रेत दिसले. ते प्रेत सुनिल विरभद्र क्यादरकुंटे (31) रा.येसगी पुर्नवसन ता.बिलोली यांचे होते. बिलोली पोलीसांनी 12 नोव्हेंबर रोजी याबाबत आकस्मात मृत्यू क्रमांक 16/2022 दाखल केला.
दि.12 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सौ.निर्मला विरभद्र क्यादरकुंटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 11 नोव्हेंबर रोजी सुनिल क्यादरकुंटेला ज्ञानेश्र्वर गंगाराम परसुरे रा.कार्ला (बु) ता.बिलोली या सोबत घेवून गेला होता.ज्ञानेश्र्वर परसुरे घरी आल्यावर त्याला विचारणा केली असता सुनिल क्यादरकुंटेने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे सांगितले. परंतू ज्ञानेश्र्वर परसुरेनेच सुनिलला सोबत नेले होते. सुनिलने गळफास घेतला नसून ज्ञानेश्र्वर परसुरेने त्याचा खून केला आहे. असा या तक्रारीचा आशय आहे. बिलोली पोलीसांनी गुन्हा क्रमांक 225/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 302 नुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास बिलोलीचे पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे हे करीत आहेत.
गळफास घेतलेल्या परिस्थितीत सापडलेल्या माणसाच्या मृत्यूसंदर्भाने खूनाचा गुन्हा दाखल