नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे दरमहा 25 ते 30 लाख रुपयांची हप्ता वसुली केली जाते अशा आशयाचे एक निवेदन लोहा तालुक्यातील पाच जणांच्या स्वाक्षरीने पोलीस अधिक्षक कार्यालयात देण्यात आले आहे. या निवेदनात श्रीमान तोंडी आदेशाने नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक असलेले श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांची परिक्षेत्रा बाहेर बदली करण्याचा विषय या निवेदनात लिहिलेला आहे. पण ही मागणी पोलीस अधिक्षक नांदेड यांच्याकडे करण्यात आली आहे.
दि.9 नोव्हेंबर रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयात माळेगाव ता. लोहा येथील गौतम निवृत्ती वाघमारे, माळाकोळी ता.लोहा येथील अनिल निवृत्ती ढवळे, बोरगाव(आ.क.) ता.लोहा येथील शेषराव दत्ता हंकारे, लोहा जि. नांदेड येथील शिवराज देविदास दाढेल, कारेगाव ता. लोहा येथील केरबा शेषराव गायकवाड अशा पाच जणांच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत. या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य आणि विशेष पोलीस महानिरिक्षक नांदेड यांच्या नावानेपण लिहिलेले आहे.
या निवेदनात पुढे लिहिल्याप्रमाणे दि.6 जून 2022 रोजी पोलीस अंमलदार शिवा पाटील यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्यांना अटक केली. तदनंतर लगेच पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांची तोंडी आदेशाने पोलीस अधिक्षक कार्यालयात बदली करण्यात आली होती.(पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तोंडी आदेशानेच कार्यरत आहेत.) परंतू अशोक घोरबांड यांनी पैसा व दंड असा वापर करून राजकीय पुढारी यांच्यासोबत पैशांची देवाण-घेवाण करून ते पुन्हा नांदेड ग्रामीणला रुजू झाले. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध वाळू वाहतूक, मटका व जुगार, अनाधिकृत दारु विक्री केेंद्रे, मोठ्या वाहनांची तोडफोड करणारी केंद्रे कार्यरत आहेत. ही सर्व अवैध प्रकारची काम करणाऱ्या जागा आहेत. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये जवळपास 25 ते 30 लाख रुपयांची महिनेवारी हप्ता वसुली जोरात सुरू आहे.
ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कार्यवाही केली असेल.त्या अधिकाऱ्याची बदली त्वरीत करण्यात यावी असे डी.जी. साहेबांचे परिपत्रक आहे. विशेष पोलीस महानिरिक्षक परिक्षेत्र नांदेड यांनी सुध्दा असेच समकक्ष परिपत्रक 16 जून 2019 रोजी काढलेले आहे. पोलीस महासंचालकांच्या 2021 च्या परिपत्रकानुसार पोलीस उपनिरिक्षक ते पोलीस निरिक्षक या दर्जातील पोलीस अधिकाऱ्यांना एका परिक्षेत्रामध्ये 8 वर्षपुर्ण झाली आहेत अशा अधिकाऱ्यांची बदली परिक्षेत्राबाहेर करण्यात यावी. श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांनी दोन-तीन वर्ष जास्त नांदेड पोलीस परिक्षेत्रात घालवलेले आहेत. त्यामुळे या निवेदनाची सखोल चौकशी करून त्यांची बदली त्वरीत नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या बाहेर करण्यात यावी अशी नम्र विनंती केली आहे. या निवेदनामध्ये निवेदनकर्त्यांनी भरपूर खाजगी बाबीपण लिहिलेल्या आहेत. त्या लिहुन आम्ही आमच्या लेखनीला काळेफासून घेवू इच्छीत नाही.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25-30 लाखांची दरमहा हप्ता वसुली होते