कलयुगात सतयुगाची आठवण करून देणाऱ्या ऍटो चालकांचा भाग्यनगर पोलीसांनी केला सन्मान

नांदेड(प्रतिनिधी)-आज सहज बोलतांना कलयुग सुरू आहे असा एक शब्द नेहमीच वापरला जातो. या शब्दामागे कलयुगात सर्व काही वाईटच घडते असा त्या कलयुग शब्दाचा मतीतार्थ काढला जातो. परंतू या कलयुगात सुध्दा सतयुगाची चिन्हे दिसतात आणि त्यातून आजही प्रामाणिकपणा हा उच्च दर्जाचा असतो हे दिसतेच. अशाच एका प्रमाणिक ऍटो चालकाचा सन्मान भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांनी केला. या ऍटो चालकांने एक सोन्याचे छोटे गंठन, सोन्याची पाच पाने आणि 17 हजार 830 रुपये रोख रक्कम असलेली एक बॅग भाग्यनगर पोलीस ठाण्यात आणू दिली. पोलीसांनी या साहित्याच्या मालकाला हे साहित्य सन्मानपुर्वक परत पण केले.
ऍटो क्रमांक एम.एच.26 बी.डी.2377 याचे चालक संभाजी रामजी पांचाळ रा.ओंकारनगर नांदेड हे आहेत. यांच्या ऍटोमध्ये एक प्रवासी बसला आणि तो प्रवासी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उतरला. उतरतांना त्याची बॅग ऍटोमध्येच राहिली. तो प्रवासी भोकर तालुक्यात वनरक्षक पदावर कार्यरत आहे. तो आपल्या भोकरच्या प्रवासावर निघाला आणि नंतर त्याला आपल्या बॅगेची आठवण झाली आणि मग तो परत आला.
दरम्यान ऍटो चालक संभाजी रामजी पांचाळ यांनी ही बॅग पोलीस ठाणे भाग्यनगर येथे आणली आणि पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांच्या स्वाधीन केली. सुधाकर आडे यांनी तपासणी केली असता या बॅगमध्ये एक सोन्याचे छोटे गंठण, पाच सोन्याची पाने आणि 17 हजार 830 रुपये रोख रक्कम होती. म्हणजे जवळपास या बॅगमधील ऐवजाची रक्कम अंदाजे 1 लाखांपेक्षा जास्त असेल.भोकरला गेलेला तो प्रवासी पोलीस ठाणे भाग्यनगर येथे आला. त्यांचे नाव खाकुराम माणिकराव बदुरे रा. अंबुलगा ता.कंधार असे आहे. त्यांनी पोलीस ठाण्यात येण्याअगोदरच त्यांची हरवलेली बॅग पोलीस ठाण्यात होती. पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांनी खाकुराम बदुरे यांच्याकडून सर्व हकीकत जाणून घेतली. तेंव्हा त्या बॅगमध्ये आडे यांनी तपासणी केलेले सर्व साहित्य होते.
आजच्या कलयुगात सुध्दा सतयुगाची आठवण करून देणाऱ्या संभाजी रामजी पांचाळ यांचा सन्मान करतांना सुधाकर आडे यांनी त्यांना एक पुष्पगुच्छ दिला आणि भविष्यात सुध्दा आपल्या प्रामाणिकपणाला कायम ठेवण्याच्या शुभकामना दिल्या. ऍटो चालक पांचाळ यांच्यासमोरच साहित्याचे मालक बदुरे यांना त्यांचे सर्व साहित्य परत करण्यात आले. ऍटो चालक पांचाळ यांचे मनस्वी धन्यवाद करत बदुरे यांनी पोलीस ठाणे भाग्यनगरच्या अधिकारी आणि पोलीस अंमलदारानां सुध्दा धन्यवाद दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *